राष्ट्रवादीचा नवा आणि आक्रमक चेहरा बनले डॉ. अमोल कोल्हे

राष्ट्रवादीचा नवा आणि आक्रमक चेहरा

Updated: Aug 26, 2019, 03:38 PM IST
राष्ट्रवादीचा नवा आणि आक्रमक चेहरा बनले डॉ. अमोल कोल्हे title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : छत्रपती संभाजी मालिकेमुळे महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हा राष्ट्रवादीचा नवा आणि आक्रमक चेहरा म्हणून समोर येतो आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने राज्यात अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरू केली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना लोक स्वीकारत नसल्याने हा नवा प्रयोग राष्ट्रवादीनं केला आहे. डॉ. अमोल कोल्हेंचा हा नवा राजकीय अवतार सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे.

अमोल कोल्हे राजकारणात नवे नाहीत. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्ष ते शिवसेनेत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यानंतर खासदार झाल्यावर अमोल कोल्हे खऱ्या अर्थाने राजकीय क्षितीजावर चमकले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे अमोल कोल्हे मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले. याचाच फायदा विधानसभा निवडणुकीत उचलण्यासाठी राष्ट्रवादीने अमोल कोल्हे हा पक्षाचा नवा चेहरा म्हणून लोकांसमोर आणला

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त खरं तर उदयनराजे भोसले आणि अमोल कोल्हे यांना राज्यभर फिरवलं जाणार होतं. मात्र उदयनराजे भोसले यांनी या यात्रेकडे सुरुवातीपासून पाठ फिरवली. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक नेते भ्रष्टाचाराबाबत झालेल्या आरोपाने बदनाम झालेले आहेत.  शिवस्वराज्य यात्रेत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा सहभाग असला तरी यात्रेचा प्रमुख चेहरा अमोल कोल्हे आहेत. या यात्रेत अमोल कोल्हे यांच्यासह फडकणारा भगवा ध्वजही चर्चेचा विषय ठरला आहे.

कोल्हे ओबीसी आहेत, त्यामुळे ओबीसी आणि मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे समीकरण जुळवून आणल्याची चर्चा आहे. एकेकाळी पक्षाचा चेहरा असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याही शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यात भुजबळ या यात्रेपासून दूर आहेत. त्यामुळे कोल्हेंच्या रुपाने नवं ओबीसी नेतृत्व उभा करण्याच्या प्रयत्नाचाही हा भाग असावा. 

विधानसभा निवडणुकीआधी नवा चेहरा लोकांसमोर आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. मात्र राज्यातील वातावरण पाहता लोकसभा निवडणूक जिंकून चमत्कार केलेले अमोल कोल्हे यात यशस्वी होतील का याची चिंता राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे.