आज इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी; निमंत्रणाचा सावळागोंधळ

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. 

Updated: Sep 18, 2020, 12:13 PM IST
आज इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची पायाभरणी; निमंत्रणाचा सावळागोंधळ title=

मुंबई: महाविकासआघाडी सरकारकडून मुंबईच्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पादपीठ पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा अचानकपणे जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी साडेतीन वाजता या सोहळा पार पडणार आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्षनेते आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित अनेक नेत्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच आले नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मुळात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची अनेकांना कल्पनाच नाही. यावरून मुख्यमंत्री कार्यालयातही सावळागोंधळ सुरु आहे. काहीवेळापूर्वीच आनंदराज आंबेडकर यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचे समजते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील पुण्याचा दौरा घाईघाईने आटोपून मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच मिळालेले नाही. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही केवळ महाविकासआघाडीतील नेत्यांची नावे दिसत आहेत. त्यामुळे आता यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, निमंत्रण कोणाला द्यायचं, कुणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. हे तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी दोन पक्षांशी माझे सख्य नाही. मात्र, मुख्यमंत्री स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.