ड्रोनाचार्यांचे वर्क फ्रॉम होम, ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांची बेशिस्तांवर नजर

ड्रोनाचार्यांची 'वर्क फ्रॉम होम' करून पोलिसांना मदत 

Pravin Dabholkar Updated: Apr 25, 2020, 07:09 AM IST
ड्रोनाचार्यांचे वर्क फ्रॉम होम, ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांची बेशिस्तांवर नजर

प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईसह नवी मुंबईतील रस्त्यांवर, चौकाचौकात होणाऱ्या गर्दीवर ५० हून अधिक ड्रोन्सची नजर आहे. लॉकडाऊनमध्ये सध्या घरी असणारे ड्रोनाचार्य 'वर्क फ्रॉम होम' करून पोलिसांना मदत करतायत..

कोरोनाच्या संकटात रस्त्यावरील विनाकारण होणारी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी विनम्रपणे आवाहन करत पोलिसांनी गांधीगिरी केलेली आपण पाहीली. पोलिसांच्या काठीचा तडाखा देखील काहींना बसला. पण कोरोना पॉझिटीव्हच्या संख्येसोबत देशात बेशिस्तांची संख्या देखील वाढतच आहे. या सर्वांवर एकत्र नजर ठेवण्यासाठी सध्या ड्रोन्स आणि त्यांना उडवणारे 'ड्रोनाचार्य' पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यामुळे पोलिसांना पाहून पळणारे 'बेशिस्त' आता ड्रोन आकाशात उडताना दिसला की पळ ठोकतात.

कोरोनाच्या संकटात सर्वच ठप्प झाल्याने हे 'ड्रोनाचार्य' देखील घरीच बसून आहेत. कोरोनाच्या संकटात हे ड्रोन डोळे बनून पोलिसांच्या मदतीसाठी उडत आहेत. हे ड्रोन उडवणारे 'ड्रोनाचार्य' आता पोलीसमित्र बनले आहेत. स्वयंसेवक बनून कोणताही मोबदला न घेता पोलिसांसोबत सोशल डिस्टंसिंगचे पालन करत कोरोनाशी लढा देत आहेत. आम्ही ड्रोन उडवणारे तरुण मुंबई आणि नवी मुंबईतील वेगवेगळ्या भागात राहतो. आपआपल्या बिल्डींगच्या टेरेस्टवरुन आम्ही ड्रोन उडवतो. आणि ही माहीती पोलीस कंट्रोल रुमला जाते. यामुळे पोलिसांना आजुबाजूच्या विभागावर लक्ष ठेवणं सोप्पं होतं असे ड्रोन उडवणारा तरुण प्रथमेश अवसरे सांगतो. ही संधी दिल्याबद्दल त्याने आणि त्याच्या टीमने पोलिसांचे आभार मानले आहेत. 

कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवरील ताण आणि मनुष्यबळाची कमतरता पाहता नवी मुंबई पोलिसांनी ड्रोनचा वापर करुन ड्रोनचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करुन टेरेस्टवर जमा होणे, मॉर्निंग वॉक करणे अशांवर गुन्हे दाखल केले जात असल्याची माहिती नवी मुंबई सायबर क्राईम ब्रांचचे सहायक पोलीस डॉ. विशाल माने यांनी दिली. 

 ड्रोनच्या नजरेत कोणी बेशिस्त नागरिक सापडलाच तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांची काही खैर नाही. शहरातील नियंत्रणाबाहेरची लोकसंख्या, दाटावाटीचे परिसर या प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाहीत. पण प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली तरच आपण कोरोनामुक्त होऊ शकू.