बोगस शाम्पू कारखान्याचा पर्दाफाश, इतक्या लाख रुपयांचा माल जप्त

बरेच जण रस्त्यावर किंवा गजबजलेल्या ठिकाणावरून स्वस्तातले शाम्पू खरेदी करतात. 

Updated: Feb 13, 2022, 10:03 PM IST
बोगस शाम्पू कारखान्याचा पर्दाफाश, इतक्या लाख रुपयांचा माल जप्त title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : लांबसडक, झुबरकेदार आणि सिल्की केस प्रत्येकाला हवेहवेसे असतात. केसामुळे आपल्या प्रत्येकाचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. ज्यांना केस नाहीत, ते विग लावतात, यावरुन केसाचं महत्त्व स्पष्ट होतं. केस चांगले रहावेत, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शाम्पू घेतात. बरेच जण रस्त्यावर किंवा गजबजलेल्या ठिकाणावरून स्वस्तातले शाम्पू खरेदी करतात. मात्र याच स्वस्त शाम्पूमुळे तुम्हाला तुमच्या डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ शकते. (economic offecne wing exposed bogus shampoo factory in dharavi seized 3 lakh 15 thousand)  

मुंबईत गजबजलेल्या ठिकाणी किंवा रस्त्यावर फिरताना "सौ का तीन...सौ का तीन" अशी आरोळी ठोकत नामांकित कंपन्यांचे शाम्पू विकणारे विक्रेते सर्रासपणे दिसतात. 

याच स्वस्ताईला भुलून अनेकजण या शाम्पूची खरेदीही करतात. पण जरा थांबा. स्वस्त आणि मस्त वाटणाऱ्या शाम्पूमुळे तुमच्या केसांना हानी पोहचू शकते. 

सिल्की, डँड्रफ फ्री केसांऐवजी तुम्हाला टक्कल पडू शकतं. प्रसंगी विग लावण्याची वेळ येऊ शकते. कारण मुंबईतल्या धारावीत बोगस शाम्पू कारखान्याचा पर्दाफाश झालाय. या कंपनीत ईजी मॅक्स पावडरच्या साह्यानं शाम्पू बनवले जात होते. आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत 3 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

असा बनवला जातो बोगस शाम्पू 

बोगस शाम्पू बनवण्यासाठी पाण्याचे दोन मग भरून ईजी मिक्स पावडर 50 लिटर पाण्यात मिसळली जायची. त्यानंतर त्यात सुगंधी द्रव्य टाकलं जात होतं. बोगस शाम्पू बाजारात विकण्यासाठी भंगारवाल्याकडून नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या विकत घेतल्या जायच्या. 

त्यात नकली शाम्पू भरून बाटलीला लॅमिनेशन केलं जायचं. पुढे या मालाची विक्री अत्यंत स्वस्त दरात गर्दीच्या ठिकाणी किंवा आठवडी बाजारात केली जायची.

मुंबईत फिरायला आलेले तरूण, नवविवाहित जोडपी हा स्वस्तातला माल विकत घेतात. पण या बोगस शाम्पूमुळे तुम्हाला डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा. सौ का तीनच्या चक्करमध्ये आपल्या डोक्यावरचे केस तर जाणार नाहीत ना, याची काळजी घ्या.