Ed Summons Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा इडीचं समन्स

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Updated: Jul 19, 2022, 10:56 PM IST
Ed Summons Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांना पुन्हा इडीचं समन्स title=

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Ed Summons Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. या समन्सनुसार ईडीने संजय राऊत यांना उद्या बुधवारी (20 जुलै) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राऊत यांना मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहेत. राऊत यांना याआधी 1 जुलैला समन्स बजावण्यात आलं होतं. (ed again summons to shiv sena leader and mp sanjay raut for questioning in money laundering case) 

संजय राऊत चौकशीला हजर राहणार?

राऊत यांना उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राऊत हजर राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण राऊत सध्या राज्यातील सत्तासंघर्षामुळे दिल्लीत आहेत. त्यात ईडीने उद्या सकाळी हजर राहण्याचे आदेश दिल्याने राऊत हजर राहणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

याआधीही राऊतांना समन्स

दरम्यान राऊतांना याआधी 1 जुलैला पत्राचाळ प्रकरणार ईडीने समन्स बजावलं होतं. त्यावेळेस राऊत यांची 10 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती. 

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईतील गोरेगावमध्ये ही पत्राचाळ आहे. या पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊत यांच्या मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली.

राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचं पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं. मात्र गुरु आशिष कन्सट्रक्शन कंपनीने भाडेकरुंसाठी आणि म्हाडासाठी सदनिका न बांधताच एकूण 9 विकसकांना तब्बल 901 कोटींना एफएसआय विकला. 

गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रकल्प सुरु करण्यात आला. तसेच सदनिका विकण्याच्या नावाखाली 138 कोटींची माया जमा करण्यात आली. 

मात्र यानंतर म्हाडाच्या अभियंत्याने याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर ईडीची एन्ट्री झाली. ईडीने या प्रकरणात चौकशी सुरु झाली. ईडीला तब्बल 1039.79 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्यापैकी प्रवीण राऊत यांच्या खात्यात 100 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले.

प्रवीण यांनी ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केली. या 100 कोटींपैकी 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचं समोर आलं.