वादात अडकलेल्या संभाजी भिडेंना 'सामना'तून प्रोत्साहन

'हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत'

Updated: Jun 12, 2018, 09:36 AM IST
वादात अडकलेल्या संभाजी भिडेंना 'सामना'तून प्रोत्साहन title=

मुंबई : 'आंबा खाल्ल्यानं मूल होतं' असं वक्तव्य करून वाद ओढावून घेणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मदतीसाठी शिवसेना धावलीय. आम्ही सदैव भिडे गुरुजींसोबत आहोतच, असं म्हणत शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून भिडेंना पाठिंबा दर्शवलाय. असं असलं तरी या अग्रलेखात भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्तव्यावर एक चकार शब्दही काढण्यात आलेला नाही. 

भिडेंची तुलना बाजीप्रभूंशी... 

'भिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे. ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत. म्हणूनच हाती तलवारी वगैरे घेऊन लढण्याची गर्जना त्यांनी केली आहे. भिडे गुरुजींना ही जय्यत तयारी करावीशी वाटत आहे. म्हणजेच कोणत्या तरी संकटाची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत आहे' असं सामनाच्या अग्रलेखात म्हणत भिडेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. एवढंच नाही तर त्यांची तुलना बाजीप्रभूंशीदेखील करण्यात आलीय.

'भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात हे दिसले. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो' असं म्हणत एकप्रकारे सेनेनं भीमा कोरेगाव प्रकरणात भिडेंचा हात असल्याच्या आरोपांना एकप्रकारे दुजोरा दिल्याचंच अनेकांचं म्हणणं आहे. 

Who is this man with Narendra Modi?
संभाजी भिडे - नरेंद्र मोदी

या अग्रलेखात फडणवीस सरकारलाही उकसवण्याचा प्रयत्न सेनेनं केलाय. 'सध्याचे फडणवीस सरकार भिडे गुरुजींसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या स्वप्नातले सरकार आहे व मोदी यांच्यात भिडे गुरुजींना देवत्वाचा अंश दिसतो. मोदी जेव्हा रायगडावर आले होते त्यावेळी भिडे गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिले होते. त्यामुळे स्वतः तलवारी घेऊन सुवर्णसिंहासनाचे रक्षण करणे हा फडणवीस सरकारवरचा अविश्वास ठरेल असे उद्या कुणाला वाटू शकते. मोदी-फडणवीस यांचे सरकार कुचकामी ठरल्याने हिंदू तरुणांना हाती तलवारी घ्याव्या लागल्या हा बोभाटा सरकारला महाग पडू शकतो. सरकार हिंदुत्ववाद्यांचे व हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्हाला तलवारी घ्याव्या लागतात असे होऊ नये' असं म्हणत शिवसेनेनं धार्मिक मुद्द्याला कवटाळलंय. 

भिडेंविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, नाशिकच्या मेळाव्यात बोलताना लोकांना अपत्य प्राप्तीसाठी आंबा खाण्याचा अजब सल्ला भिडेंनी दिला होता. त्यानंतर नाशिकमध्ये 'संभाजी भिडे यांचा हा दावा म्हणजे गर्भनिदान कायद्याचे सरळसरळ उल्लंघन असल्याची' तक्रार पुण्यातील आरोग्य विभागाकडे दाखल करण्यात आली आहे. गणेश बोऱ्हाडे यांनी ही तक्रार दाखल करत भिडेंवर कारवाईची मागणी केलीय... तर संभाजी भिडे याचं हे वक्तव्य दुर्दैवी असून मातृत्व आणि महिलांचा अपमान करणारं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली