दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर: झोटींग समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर, यावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, कोर्टाने विचारणा केली नाही की, गुन्हा दाखल करा, किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रकरण द्या, तर सरकारने सांगितलं, गुन्हा दाखल करू, प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊ, यानुसार गुन्हा दाखल झाला, प्रकरण एसीबीकडे देण्यात आलं.
तसेच जरी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असलं, तरी चौकशी संपत आली आहे, तेव्हा अहवालात यापेक्षा आणखी वेगळं काय येणार आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
महसूलमंत्री असताना खडसेंनी भोसरीत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाले. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी वर्षापूर्वी निवृत्त न्यायाधीश झोटिंग यांची, एक सदस्यीस समितीची स्थापना करण्यात आली होती.
भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील 3 एकर जागेचा हा वाद आहे. ही जमीन गेल्या महिन्यात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून, 3 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केली.
पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करून स्टँप ड्युटी म्हणून 1 कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले. पण ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं म्हटलं जात आहे.