फेब्रुवारीत राज्यातील 10 महापालिका, 20 नगरपरिषदांच्या निवडणुकीची शक्यता

मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 10 महानगर पालिका, 20 नगरपरिषदा  आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत

Updated: Jun 18, 2021, 06:07 PM IST
फेब्रुवारीत राज्यातील 10 महापालिका, 20 नगरपरिषदांच्या निवडणुकीची शक्यता title=

मुंबई : मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 10 महानगरपालिका, 20 नगरपरिषदा  आणि नगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीत नियोजित वेळेत घेण्याची तयारी सुरु झालीये. एकसदस्यीस प्रभागरचना पद्धतीनं या निवडणुका होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तसंच नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आणि वसई विरार या महापालिकांसह 65 नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या प्रलंबित निवडणुका येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगानं केलीये. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक महापालिकेच्या निवडणुका लांबीवर पडल्या आहेत. पण, आता महाराष्ट्रामध्ये कोरोना रूग्णांची संख्याही कमी झाली असून, यामुळे मुंबईसह राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या वर्षापासून प्रलंबित आहेत. प्रलंबित निवडणूका ऑक्टोबरमध्ये, तर आगामी निवडणूका फेब्रुवारीत नियोजित असल्याची माहिती समोर आली आहे. 

निवडणूका नियोजित करण्यात आली तर महापालिकांनी 15 ऑगस्टपर्यंत प्रभागरचना अंतिम करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या लागू असलेल्या कायद्यानुसार राज्य सरकारने एकसदस्यीय प्रभाग निश्चित केलेला आहे.

या निर्णयाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी विरोध दर्शवलाय. एकसदस्यीय प्रभाग असेल तर निवडणूकीत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचं पाटील म्हणाले.