कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : पावसामुळं आज सकाळी मुंबई पुन्हा तुंबली. मुंबई तुंबण्यास महापालिकेचा भ्रष्ट कारभारच कसा कारणीभूत आहे, याचे पुरावे झी २४ तासच्या हाती लागले आहेत. पुढचा आठवडाभर पालिकेच्या या भ्रष्ट कारभाराचं वास्तव आम्ही दाखवणार आहोत. त्याच मालिकेतील हा पहिला EXCLUSIVE रिपोर्ट.
मुंबईचे गुन्हेगार कोण, हे आता आम्ही पुराव्यानिशी मांडणार आहोत. पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील रस्त्याच्या कडेच्या गटारी, छोटे नाले, बॉक्स ड्रेनेज असं सर्व काही दररोज साफ केलं जातं. त्यातून तब्बल १९०० मेट्रिक टन गाळ निघतो.
हा गाळ मुंबईबाहेर नेण्यासाठी २०१६ ते २०१८ या दोन वर्षांसाठी ४६ कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं. या कंत्राटदारानं तब्बल १३ लाख ८७ हजार टन गाळ मुंबईबाहेर नेला, असं आकडेवारी सांगते. त्याआधीच्या ४ वर्षांसाठी गाळ मुंबईबाहेर नेण्याचं कंत्राट ६० कोटींना देण्यात आलं होतं. त्यावेळी तब्बल ४० लाख मेट्रिक टन गाळ काढण्यात आला.
म्हणजे मेट्रो ३ च्या भुयारीकरणातून जेवढे दगड, माती निघणार त्याहून अधिक टन गाळ सहा वर्षांत काढण्यात आल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे असा गाळ वाहून नेण्याचं काम झालेलंच नाही. कारण वर्षातून केवळ एकदाच पावसाळ्यापूर्वी नाले, गटारी साफ केल्या जातात.
गाळ निघतो की नाही, याच्याशी घनकचरा व्यवस्थापन विभागाला काही देणंघेणं नाही. त्यांना रस आहे तो गाळ वाहून नेण्याच्या कंत्राटामध्ये. वॉर्ड स्तरावर हा सगळा गैरव्यवहार आकार घेतो.
वॉर्डमधील परिरक्षण विभाग एनजीओ कामगारांच्या मदतीनं नाले, गटारींमधला गाळ काढतात. आणि तो वाहून नेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नावे परिरक्षण विभाग मेमो काढतात. जर रोज गाळ काढला जातो तर रोज मेमो दिसायला हवेत.
पण फक्त मान्सूनपूर्व एप्रिल आणि मे महिन्यातच अधिकतर मेमो दिसतात. गाळ काढणारे एनजीओ कामगारही पावसाळ्यातच जास्त प्रमाणात कार्यरत असल्याचं आकडेवारी सांगते.
म्हणजे संपूर्ण वर्षभर एनजीओ कामगारच नसतात, मग दररोज १९०० मेट्रिक टन गाळ कोणी काढला, याचं उत्तर महापालिकेकडं नाही. मात्र हा न काढलेला गाळ वाहून नेण्याचं काम वाहतूक कंत्राटदार दररोज करत असल्याचं कागदोपत्री दाखवण्यात येतं.
गाडी कुठं भरली, किती वाजता भरली, त्याची तपासणी कुणी कुणी केली याचा महत्वाचा पुरावा म्हणजे लॉगशीट. मात्र या लॉगशीटच बोगस तयार केल्या जातात. सकाळी साडे सहा ते दुपारी दीडपर्यंत कामावर असलेला मुकादम पहाटेपासून रात्रीपर्यंतच्या गाड्यांच्या लॉगशीटवर सह्या कशा करतो? हा प्रकार महिनोन महिने चालतो. एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील अनेक को-या लॉगशीटच ' झी 24 तासच्या हाती सापडल्या आहेत.
विशेष म्हणजे त्यावर कनिष्ठ अवेक्षक, अधिक्षकांच्या शिक्क्यासह सह्याही आहेत. कंत्राटदारच कोऱ्या लॉगशीट भरत असल्याचं या कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय.
२०१५ मध्ये नालेसफाई गैरव्यवहार समोर आला. मात्र त्याला समांतर असा हा गाळ गैरव्यवहार पहिल्यांदाच झी २४ तासच्या माध्यमातून समोर येतो आहे.