बाळासाहेब यांनी शिवसेना अशी वाढवली, जोपासली?, पाहा ही दुर्मिळ छायाचित्रं

हे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन सांगतंय... बाळासाहेबांनी अशी वाढवली, जोपासली शिवसेना...

Updated: May 17, 2022, 06:07 PM IST
बाळासाहेब यांनी शिवसेना अशी वाढवली, जोपासली?, पाहा ही दुर्मिळ छायाचित्रं title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक झंझावात. बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्वचं असं होती की त्यांची एकेक छबी आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी जवळपास प्रत्येक कॅमेरामन धडपडत असे. अनेक नामवंत कॅमेरामनने बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध मुद्रा आपल्या कॅमेरात कैद केल्या आहेत. 

यातीलच निवडक आणि दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आजपासून कुलाबा इथल्या मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलं आहे. आजपासून 19 मे पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे.

दुर्मिळ फोटो पाहण्याची संधी
या प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनातील अनेक घटनांची छायाचित्रे आहेत. शिवसेना उभी करत असतानाच संघर्ष, सुरुवातीच्या काळातील त्यांचे सहकारी, त्यांच्या विराट सभा, सभेतील टिपलेले अविस्मरणीय क्षण फोटोद्वारे तुम्हाला या प्रदर्शनात पाहता येतील.

पत्नी मीना ठाकरे यांच्याबरोबरील काही दुर्मिळ फोटोही प्रदर्शनात पाहता येणार आहेत. युतीची सत्ता राज्यात प्रथम आली आणि शिवसेनेचा नेता प्रथम मुख्यमंत्री झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरे मंत्रालयात प्रथम गेले होते. तेव्हाचा दुर्मिळ फोटो प्रदर्शनात लावण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि सध्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देताना आणि उद्धव ठाकरे यांचा कॅमेरा हाताळतानाचे फोटोही प्रदर्शनात पाहता येणार आहेत. 

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत नेते प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, शरद पवार यांच्याबरोबर काढण्यात आलेले निवडक फोटोही इथे पाहता येणार आहेत. याखेरीज अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, माधुरी दीक्षित, मायकल जॅक्सन यांच्याबरोबरील फोटोही पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.

ठाकरे परिवार आणि कला 
ठाकरे परिवार आणि कला यांचं एक अतूट असं नातं आहे. बाळासाहेब ठाकरे स्वतः एक नामांकित व्यंगचित्रकार होते. त्यांचा मुलगा आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील उत्तम फोटोग्राफी करतात. तर राज ठाकरे हेदेखील व्यंगचित्रकार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनादेखील पक्षी प्राण्यांचे फोटो काढण्याची आवड आहे. 

या फोटोग्राफर्सचे फोटो प्रदर्शनात
अरुण पाटील, आशिष राणे, अतुल कांबळे, अंशुमन पोयरेकर, आझाद श्रीवास्तव, आशिष राजे, भूषण कायंदे, बिपीन कोकाटे, दीपक साळवी, दिलीप कागडा, दत्ता खेडेकर, मंदार काकडे, इंद्रनील मुखर्जी, जयप्रकाश केळकर, के.के. चौधरी, कुणाल पाटील, मंदार देवधर, निमेश देव, प्रसाद लोके, प्रशांत चव्हाण, प्रशांत नाडकर, प्रशांत नाकवे, पुनित परांजपे, राजू काकडे, राजेश जाधव, रजनीश काकडे, सचिन वैद्य, संदीप पागडे, संजय हडकर, सतीश माळवदे, सत्यजीत देसाई, सुजित जैस्वाल, सुधाकर ओलवे, शैलेश जाधव, शैलेश मुळे, विवेक बेंद्रे, नितीन सोनवणे