देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Updated: May 7, 2020, 07:22 PM IST
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह title=

दीपक भातुसे, मुंबई :  राज्यात राजकीय नेतृत्व दिसत नाही, अशी टीका करत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय नेतृत्व नसल्याने प्रशासनात गोंधळ आणि समन्वयाचा अभाव असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या बैठकीनंतर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काही गंभीर मुद्दे मांडल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आता ज्या प्रकारे निर्णय घेताना राजकीय नेतृत्व दिसले पाहिजे, प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवण्याचे काम राजकीय नेतृत्वाचे असते. पण समन्वय घडत नाही, तो घडवला पाहिजे, ही माझी मागणी आहे, असे फडणवीस म्हणाले.

मुंबईची परिस्थिती गंभीर आहे. ती हाताबाहेर जात आहे अशी शंका निर्माण होते, त्यामुळे मुंबईकडे विशेष लक्ष आता दिलेच पाहिजे. आकडे लपवणे वगैरे भानगडीत न पडता कशाप्रकारे मुकाबला करता येईल हे पाहिले पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

केंद्र सरकार जी मदत करायला हवी ती करेल. केंद्र सरकारने याआधी १६०० कोटी रुपये दिले. स्थलांतरित कामगारांना अन्नधान्य पुरवणे, किंवा तातडीने मदत करणे वगैरेसाठी ही रक्कम होती. याशिवाय ४६८ कोटी रुपये वैद्यकीय साहित्य उपलब्ध करण्यासाठी दिले. याशिवाय साहित्यही दिले. ३८०० कोटी रुपये अँडव्हान्स दिला. जे पुढच्या मार्चमध्ये मिळाले असते त्याचा अँडव्हान्स हप्ता दिला. पण राज्याला आपली भूमिका निभवावीच लागेल. आपले राज्य समृद्ध राज्य आहे. आपल्या राज्यात महामंडळं, प्राधिकरणांकडे पैसा आहे. तो सगळा पैसा घ्यावा असे मी म्हणणार नाही. पण आवश्यकता पडली तर तोही आपल्याला वापरता येईल. या संदर्भात केंद्राकडे मागणी केली पाहिजे पण आपणही काही केलं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. केंद्राकडे आपणही पाठपुरावा करू आणि आजवर महाराष्ट्राला सर्वाधिक मदत देण्यात आलेली आहे. भाजपशासित राज्यांपेक्षाही जास्त मदत महाराष्ट्राला देण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईसारख्या ठिकाणी जिथे कंटेन्मेंट झोन आहेत, तिथे दारुची दुकाने सुरु करू नये, तिथे पोलिसांना या कामात टाकणे योग्य नाही, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ग्रीन झोनमध्ये एकवेळ सुरु करता येतील, पण कौटुंबिक हिंसाचार वाढेल असेही म्हटले जाते. त्यामुळे दारुची दुकाने बंद ठेवावीत, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले राजकारण करू नये. आम्ही राजकारण करत नाही. त्यांच्याबरोबर असलेले लोक काय करत आहेत ते पाहावे. काहीही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही, असं बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 

लॉकडाऊनमधून बाहेर पडून अर्थव्यवस्था कशी सुरु करायची याचा विचार करावा लागेल. परिस्थितीप्रमाणे निर्णय़ घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले. काही क्षेत्र आता सुरु करावी लागतील, तसेच केंद्र सरकार जशी आर्थिक मदत देत आहे, तशी राज्य सरकारलाही द्यावी लागेल, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सुचवले, त्यांनीही त्याची नोंद घेतली आहे, असं फडणवीस यांनी सांगितले.