महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली? या फोटोमागे दडलंय काय?

खरोखर आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दिल्लीत भेटले का?

Updated: Nov 26, 2021, 08:53 PM IST
महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली? या फोटोमागे दडलंय काय? title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आज दिल्लीत होते. (Political developments in Delhi) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे दिल्लीत संघटनात्मक बैठकीसाठी आले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राज्यातील नियोजित कार्यक्रम रद्द करत राजधानीत दाखल झाले होते. 

सोशल मीडियावर फोटो व्हायरल
नारायण राणे यांचा दावा आणि त्यानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच सोशल मीडियावर दिल्लीत अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणीस आणि शरद पवार चर्चा करत असतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चाही सुरु झाली. 

या फोटोमागचं सत्य काय
पण व्हायरल झालेला हा फोटो मॉर्फ केलेला असून याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मॉर्फ केलेला हा फोटो शेअर करत म्हटलं आहे. 'अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर खात्याने असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.

शरद पवार अचानक दिल्लीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपले सर्व कार्यक्रम रद्द करत अचानक दिल्लीला दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही होते. त्याचवेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलही दिल्लीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. 

काय म्हणाले होते नारायण राणे
केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जयपूर दौऱ्यावर पोहोचले होते. महाराष्ट्रातील वातावरणाबाबत राणे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे असे वातावरण निर्माण केले जाते. मात्र मार्चपर्यंत तेथे भाजपचे सरकार स्थापन होईल. यानंतर अपेक्षित बदल दिसून येईल. पुढे राणे म्हणाले की, सरकार पाडणे आणि स्थापन करणे हे सीक्रेट आहे.