Faqt Check | टाळ्या वाजवून खरच फुफ्फुस सक्षम होतं?

आता टाळ्या वाजवल्या तर ओमायक्रॉनपासून सुरक्षा मिळते असा मेसेज व्हायरल होऊ लागलाय.

Updated: Nov 30, 2021, 08:09 PM IST
Faqt Check | टाळ्या वाजवून खरच फुफ्फुस सक्षम होतं?

विशाल करोळे,  झी 24 तास, औरंगाबाद : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे सर्वांची चिंता वाढलीय. नव्या व्हेरियंटसोबत सोशल मीडियात पुन्हा एकदा घरगुती उपायांचा पाऊस पडू लागलाय. आता टाळ्या वाजवल्या तर ओमायक्रॉनपासून सुरक्षा मिळते असा मेसेज व्हायरल होऊ लागलाय. या मेसेजमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न झी 24 तासनं केलाय.  कुणाचंही कौतुक करण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी आणि चांगल्या कामाला प्रतिसाद म्हणून आपण टाळ्या वाजवतो. टाळ्यांचा कोरोनाचा नवा घातक व्हेरिंयट ओमायक्रॉनला घालवण्यासाठीही उपयोग होतो,  असा मॅसेज व्हायरल होतोय. (Faqt Check clap hands and avoid corona see true or false)

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटलंय?

टाळ्या वाजवून तुम्ही फुफ्फुसाची क्षमता वाढवू शकता. त्यामुळे नव्यानं आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटपासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात वाचू शकता. उजव्या हाताचं छोटं बोट आपल्या लिव्हरची काळजी घेतं असं आयुर्वेदानं सांगितलंय. त्यामुळे दोन्ही हाताचे पंजे, मनगटं आणि उजव्या हाताच्या छोट्या बोटांचा टाळ्या वाजवून मसाज करा आणि कोरोनाला दूर पळवा, असं या व्हायरल मेसेजमध्ये म्हंटलंय. 

टाळ्या वाजवल्यानं शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरूळीत होते हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र कोरोनाला दूर ठेवता येतं का? यावरून आता चर्चा सुरू झालीय. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं झी 24 तासनं या मेसेजची सतत्या पडताळण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा. त्यामुळे आमच्या पडताळणीत सत्य समोर आलं.

खरं काय खोटं काय?

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हवेतून पसरतो त्यामुळे मास्क वापरणं, हात स्वच्छ ठेवणं, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टीच आपला बचाव करू शकतात. केवळ टाळ्या वाजवून ओमायक्रॉनला दूर ठेवता येणार नाही. 

एक्युप्रेशर पद्धती भारतात वापरली जाते काही लोकांना त्यावर विश्वासही आहे. मात्र हवेतून पसरणा-या व्हायरलसाठी ती प्रभावी आहे का ? तर याचं उत्तर तज्ञांच्या मते नाहीये, त्यामुळं सरकारनं दिलेल्या सूचना पाळणं हेच गरजेचं आहे.

आमच्या पडताळणीत टाळ्या वाजवून ओमायक्रॉनला दूर ठेवता येतं, हा मेसेज असत्य ठरलाय. अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नका. सरकारनं आखून दिलेले नियम पाळा, हाच खरा कोरोनाला दूर ठेवण्याचा उपाय आहे.