मुंबई : आज दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन मोठ्या भक्तीभावाने आणि भावपूर्ण वातावरणात करण्यात आलं. आपल्या लाडक्या बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात बाप्पाला निरोप दिला.
घरगुती गणपतींचं आज प्रामुख्यानं विसर्जन झालं.मुंबईतल्या सर्वच चौपट्यांवर आज या निमित्तानं गर्दी होती. अनेक शहरांमध्ये कृत्रीम तळी उभारण्यात आलीत. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणेनंही विशेष काळजी घेतली. एकूणच आज समुद्रकिनाऱ्यावरचं वातावरण हे बाप्पांच्या निरोपामुळे गणेशमय झालंय.
तर पुणे, नाशिक, नागपूर आणि ठाण्यातही मोठ्या भक्तीभावानं लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दीड दिवसानंतर विसर्जनाची नागपूरला फारशी परंपरा नसल्याने दहाव्या दिवशी ज्याप्रकारे विसर्जनाची लगबग असते तशी नव्हती.
तरीही नागपूरच्या फुटाळासह अन्य तलावात आणि कृत्रिम टाक्यात देखील बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन झालं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि एक-दोन-तीन-चार गणपतीचा जयजयकारच्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.