मुंबई : चटपटीत आणि खुसखुशीत पाणीपुरी पाहून तुमच्या तोंडाला हमखास पाणी सुटतं... पण या पाणीपुरीचं गलिच्छ वास्तव पुन्हा एकदा उघड झालंय.
मुंबईतल्या गोवंडी, मानखुर्द भागात पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणाऱ्या चार कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारलेत. एफडीएला मागील काही दिवसांमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या या स्वच्छ आणि हायजेनिक नसतात, अशी तक्रार वारंवार केली जात होती.
या तक्रारींची दखल घेत आज पहाटे ४.०० वाजल्यापासून अधिकाऱ्यांनी हे धाडसत्र सुरू केलं. या तक्रारी सत्य असल्याचं समोर आलंय. अत्यंत गलिच्छ ठिकाणी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवण्याचं काम सुरु असल्याचं आढळून आलंय.
छापे घातलेल्या चार कारखान्यातील काही पुऱ्या या तपासणीसाठी नेल्या आहेत. या पुऱ्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधित कारखाना मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.