मुंबई : मुंबईत उदरनिर्वाहासाठी आणि आसऱ्यासाठी वाहतूक दिवे (सिग्नल) किंवा उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या मुलांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) महत्त्वाचं आणि अभिनव पाऊल उचललं आहे. तब्बल 100 मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेची 'सिग्नल शाळा' महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. मुंबई पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली चेंबुरमधल्या अमर महल ही 'सिग्नल शाळा' (Signal School) उभारण्यात येणार आहे.
राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मुंबईतील बेघर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. त्या अनुषंगानेच नाविण्यपूर्ण अशा 'सिग्नल शाळे'ची उभारणी करण्याचाही पर्याय मंगलप्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुचवला होता. बेघर मुलांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षणाची सुविधा, बौद्धिक विकास आणि उज्वल भविष्यासाठीची संधी देणारी 'सिग्नल शाळा' उभारण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. जिल्हा नियोजन समिती (मुंबई उपनगर)च्या निधीतून सदर प्रकल्पासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईत पूर्व उपनगरामध्ये बेघर मुलांसाठीच्या झालेल्या सर्वेक्षणानुसार चेंबूर इथल्या अमर महाल इथं महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने सिग्नल शाळेसाठी जागा शोधली. या शाळा उभारणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेमध्ये अत्यावश्यक साधनसामुग्री, विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणे आणि साधनसामुग्री, संगणक, प्रिंटर्स तसेच शाळेशी निगडित इतर बाबींचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय आणि लहान मुले उदरनिर्वाहासाठी वाहतूक दिवे (सिग्नल), उड्डाणपुलाखाली तसंच चौकाच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचं आढळतं. यासाठी समर्थ भारत व्यासपीठ स्वयंसेवी संस्थेने 2018 मध्ये ठाणे इथल्या तीन हात नाका इथं सिग्नल शाळा सुरू केली होती. सिग्नल जवळच्या बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था चांगले काम करत आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षणही घेतलं आहे.
याच धर्तीवर मुंबईत पूर्व उपनगरात एक सिग्नल शाळा उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. साधारणपणे 60 ते 100 विद्यार्थ्यांच्या क्षमतेची ही शाळा उभारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने निविदा प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. अधिकाधिक अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शाळांच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसोबतच कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीचा प्रयत्नही या पुढाकाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितले.