पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवा, पूरस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी पूरस्थितीचा आढावा घेतला.

Updated: Aug 7, 2019, 03:48 PM IST
पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवा, पूरस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांचे आदेश title=

मुंबई : राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा, कोयना, कृष्णा या नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात अनेक गावे आणि शहरे पाण्याखाली गेली आहेत. येथील लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी कोस्टगार्ड आणि नौदलाची मदत घेण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी पूरस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीआधी राज्यातील सर्व पूरपरिस्थिती जिल्ह्यातील आढावा घेतला. पूरग्रस्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते, यासाठी आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालघरच्या आदिवासी दुर्गम भागात अन्न धान्य साठा करून ठेवण्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देशमुख, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन आणि रेल्वेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

ज्या जिल्ह्यात पूर ओसरला आहे, तेथे पिण्याच्या पाण्याच्या नळ जोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

कराडची पातळी कमी झाली आहे, मात्र पाटणला अजूनही पाण्याचा वेढा आहे. येथे५१ हजासर लोक बाधित झाले आहेत.११  हजार ४३४ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. ४१ बोटी मदतकार्यासाठी पोहचल्या आहत, तर १४ बोटी आणखी पोहोचतील, अशी माहीती मुख्यमंत्री यांनी दिली. मिरज आणि कोल्हापुरात जाणाऱ्या सर्व रेल्वे वाहतूक बंद केले आहेत. मुंबई - बंगळुरू महामार्गावरचे काही पूल आता सुरू  करण्यात आला आहे. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर शेतीच्या नुकसानाचा पंचनामा करणार आहोत. नाशिकमध्ये १०५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. चार महिन्यांचा पाऊस एकाच वेळी झाला आहे. त्यामुळे येथे पूरस्थिती गंभीर आहे.