मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी दाखल होत असतात. अनेकजण दोन दिवस आधीच मुंबईत दाखल होतात. दोन दिवस शिवाजी पार्कवरच अनुयायी मुक्काम करतात. ढोल वाजवत आणि गाणी गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी महामानवाच्या विचारांमध्येच शिवाजी पार्कवरील वास्तव्यात आपला वेळ व्यतित करत असतात.
मुंबईत चैत्यभूमीवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी काही दिवस आधीच मुंबईत दाखल होत असतात. बहुतांशजण दादरमधील शिवाजी पार्कवर राहतात. निवास मंडपातच ते जेवतात आणि इथंच झोपतात मात्र चैत्यभूमीला अभिवादन केल्याशिवाय काही ते जात नाहीत.
अशापद्धतीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी महामानवाच्या विचारांची इथं देवाणघेवाण करतात. लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येऊन महामानवाला वंदन करतात त्यांच्या विचारांनी प्रेरित होतात आणि मगच मुंबई सोडतात.
भीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेने सोलापूर येथून २ विशेष गाड्या सोडल्या आहेत. ५ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता सोलापूर स्थानकातून ही गाडी सुटणार आहे. ही गाडी सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-दादर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर थांबणार आहे.
कलबुर्गीहून गुरूवारी ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.२५ वाजता विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. तर मुंबईहून सोलापूरकडे येण्यासाठी ७ डिसेंबरला रात्री १२.२५ वाजता आणि तर कलबुर्गीला जाण्यासाठी ७ डिसेंबर रोजी १२.२५ वाजता गाडी सुटणार आहे.
एसटी महामंडळाने देखील विविध आगारातून गर्दीनुसार बसेस सोडण्याच्या सूचना सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. पनवेल-दादर, अलिबाग-पनवेल-दादर, भिवंडी-दादर-मुंबई या मार्गांवर दिवसभरात एसटीतर्फे शंभर फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.