माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ

- साक्षीदाराने केले गंभीर आरोप

Updated: Jan 10, 2022, 07:44 PM IST
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ title=

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर साक्षीदार रियाज भाटी याने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे त्या दोघांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचे आरोप केले होते. या प्रकरणी ईडीने यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात देशमुख यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार रियाज भाटी याने आज एकूण ८४ पानांची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेमधून गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. या याचिकेवर पुढील दोन दिवसात सुनावणी होणार आहे.

या याचिकेमधून परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या शासकीय बंगल्यावर बैठका होत होत्या. तसेच, माझ्यावर दबाव आणून मला परमबीर सिंग यांच्या विरोधात साक्ष द्यायला सांगितली होती. मात्र, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला असेही या याचिकेत म्हटले आहे. 

३१ मार्च २०२१ रोजी अनिल देशमुख यांच्या बंगल्यावर पहिली बैठक झाली होती. त्याआधी भाटी याने अनिल देशमुख यांच्यासोबत सेल्फी काढला होता. या फोटोसह अन्य काही ॲाडिओ रेकाॅर्डिंगहि भाटीने याचिकेसोबत पुरावा म्हणुन सादर केल्या आहेत. या नव्या आरोपामुळे देशमुख यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.