माजी नगरसेविकेला रात्री मेसेजेस करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला जेलची हवा

Mumbai Municipal Corporation officer jail : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Updated: Aug 18, 2022, 10:39 AM IST
माजी नगरसेविकेला रात्री मेसेजेस करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला जेलची हवा title=

मेघा कुचिक / मुंबई : Brihanmumbai Municipal Corporation officer jail : मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने 43 वर्षीय बीएमसी अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिवसेनेच्या एका नेत्याच्या पत्नीला जी स्वतः नगरसेवक पदावर होती. त्यांना अश्लील संदेश पाठवल्याबद्दल न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.

2016 मधील घटना. रात्री उशिरा पाठवलेल्या अनेक मेसेजमध्ये 40 वर्षीय महिलेला "गुडिया" (Gudiya) असे संबोधल्याबद्दल मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला न्यायालयाने दोषी ठरवले. या दोषीला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. माजी नगरसेविकेला 'गुडीया' म्हणून मेसेजेसमध्ये संबोधण्यात आले आहे. महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत. महिला विवाहित आहे. तसेच आरोपीने मेसेजेस रात्री 11.30 ते 12.30 दरम्यान पाठवलेले आहेत. कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्याला बाधा आणणारे कोणतेही मेसेजेस पाठवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. 

आरोपी नरसिंग गुडे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 509 (महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याचा हेतू असलेला शब्द, हावभाव किंवा कृती) कलम 67 (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे), 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  “तू झोपली आहेस का, तू विवाहित आहेस की नाहीस, तू हुशार दिसतेस, तू खूप गोरी आहेस, मला तू आवडतेस, माझे वय 40 वर्षे आहे, उद्या भेटू.” असे मेसेजेस आरोपीने या महिलेला पाठवलेले आहेत. अज्ञात क्रमांकावरुन काही अश्लील छायाचित्रेही पाठवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

महिलेच्या पतीने अनोळखी नंबरवर कॉल केला असता ऑनलाईन गप्पा मारु, असा मेसेज पुन्हा त्या महिलेला आला. त्यानंतर महिलेने दहिसर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. महिला आणि तिचे पती दोघेही माजी नगरसेवक आहेत. तर आरोपी बीएमसी अधिकारी होता.

या दाम्पत्याचे आणि अधिकारी यांच्यात वैयक्तिक वैर असल्यानेच एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचा दावा, आरोपीकडून करण्यात आला. मात्र दंडाधिकारी व्ही.जे.कोरे यांनी तो युक्तिवाद फेटाळून लावला.