मुंबई : बोलणीच पुढे होत नसल्याने आजही डेडलॉक कायम आहे. संपाचा चौथा दिवस असून संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान, आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हा संप मुद्दाम चिघळविण्यात येत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेकडे परिवहन खाते असल्याने हा संप सुरु ठेवण्यात आल्याचा आरोपही दुसरीकडे करण्यात येत आहे. यामागे भाजपचा हात नाही ना, अशीही कुजबुज आता सुरु झालेय. शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी संपाचा 'डाव' केल्याचे दबक्या आवाजत बोलले जातेय. दरम्यान, काही वेळापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संपाबाबत माहिती दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार याची उत्सुकता आहे.
सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटना ठाम आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी किमान ५ हजार ते २० हजार रुपयांपर्यंतची पगारवाढ देऊ केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर लाभ देण्याचेही कबूल केले तरीही संप सुरुच ठेवण्याचे कारण काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे, असे सांगत शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय या संपाच्या आगीत तेल कोण ओततेय, असा सवाल करण्यात आलाय.
एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर २.५७ गुणांकनानुसार सध्याच्या एकूण पगारावर ३५ टक्क्यांपर्यंत वाढ देण्याचा प्रस्ताव परिवहनमंत्र्यांनी दिला. त्याशिवाय ११ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता देण्याचे कबूल केले. म्हणजेच एका कर्मचाऱ्याला किमान ५ ते २० हजारांपर्यंतची पगारवाढ मिळणार आहे. तशी चर्चा १३ व्या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संघटनांना ही पगारवाढ मंजूर नाही. त्यांनी संप सुरुच ठेवला असून आज संपाचा चौथा दिवस आहे.