मुंबई: गणेशोत्सवासाठी आता एक महिन्याचा अवधी असताना सर्वत्र गणपती सजवटीसाठी लगबग पाहायला मिळतेय. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाल आकर्षक मखरात बसवण्यासाठी बाजारात पर्यावरणपूरक मखर आलेत. पेपर पल्प आणि कोरोगेटेड शीटपासून तयार केलेले मखर सर्वांचं लक्ष वेधून घेताहेत. या मखरावर पाणी पडलं तरी काही होत नाही. त्यामुळे गणेशभक्तांना हे मखर पसंत पडताहेत.
गणेशोत्सवाची तयारी घरोघरी सुरू झाली असून सजावटीचे साहित्य,गणरायासाठी मखर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसत असून, लाडक्या दैवताच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. चौकाचौकात मांडव बांधणीला वेग आला असून, आसपासच्या परिसरात झालरी, कमानींची सजावट करण्यात आली आहे. तर, अनेक ठिकाणी विद्युत रोषणाईच्या कामांनाही वेग आला आहे.
दरम्यान, सरकारच्या प्लॅस्टिक बंदीचा बाजारपेठेवरही मोठा परिणाम जाणवतो आहे. प्लॅस्टिक बंदीच्या या निर्णयाबाबत नागरिकांच्या मनात काहीसे दिलाशाचे वातावरण असले तरी, प्लॅस्टिक वस्तूंचे विक्रेते आणि उत्पादकांमध्ये मात्र काहीसे नाराजीचे वातावरण आहे. याआधी आरास करण्यासाठी थर्माकोलचा वापर व्हायचा. पण, थर्माकॉल बंदीमुळे ग्राहक आणि विक्रेते यांनाही पर्याय शोधावा लागणार आहे. त्यामुळे सध्यातरी आपण 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत असल्याचे विक्रेते सांगत आहेत.