मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पाचे आज आगमन होत आहे. संपूर्ण राज्यात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर पुढील दहा दिवस प्रत्येकजण लाडक्या बाप्पाच्या भक्तीरसात रंगून जाणार आहे. बाजारपेठांमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी रविवारी बाजारपेठांमध्ये लोकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र होते.
आज, गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेशमूर्ती स्थापना व पूजन करावे असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. गणेशमूर्ती स्थापना आणि पूजन राहूकाल व भद्राकालात करता येते हेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आवश्यक त्या सर्व खबरदारीचे उपाय केले आहेत. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तसेच गणेश मंडळांच्या स्वयंसेवकांनाही पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले. आहे.
याशिवाय, मुंबईतील खास आकर्षण असलेल्या लालबाग राजाच्या बंदोबस्तासाठी चार डिसीपी, ५०० हवालदार, तैनात असतील. ड्रोन स्थानिक पोलीस ठाण्यातील परवानगीनंतरच उडवता येतील. याशिवाय, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ५३ रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तर ५६ मार्गांवर एकेरी वाहतूक, १८ मार्ग अवजड वाहनांसाठी बंद आणि शहरात ९९ ठिकाणी नो पार्किंग क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे.