Ganesh Visarjan On Gate Way Of India : दोन वर्ष कोरोना महामारीमुळे राज्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. परंतु आता निर्बंध हटल्यानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडूनही गणपती विसर्जनाची मोठी तयारी करण्यात येत असून आता मुंबईतील प्रसिद्ध ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ गणपती विसर्जनाची परवानगी देण्यात आली आहे. परंतु परवानगी देताना मुंबई पोर्ट ट्रस्टनं मुंबई महापालिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यामुळं आता ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ विसर्जन करताना गणेशभक्तांना अटींचं पालन करावं लागणार आहे. (Ganesh Visarjan 2022 )
या अटींवर दिली परवानगी?
१. पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन करण्यात यावं
२. विसर्जनानंतर तेथील घाण साफ करण्यात यावी
३. जेट्टीचे कोणतेही नुकसान केलं जाऊ नये
४. विसर्जनाआधी बीपीटी प्राधिकरणाला माहिती देण्यात यावी
५. समुद्राची दररोज साफसफाई करावी
६. प्रवासी बोटींना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी
या काही अटींवर बीपीटीनं ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ गणेश विसर्जनाची परवानगी दिली आहे. याशिवाय मुंबई महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी तलाव आणि समुद्र किनाऱ्यांवर विसर्जनाची सोय केलेली आहे. त्यात दादर चौपाटी, गिरगाव चौपाटी, माहीम, जुहू आणि आरे कॉलनीच्या समुद्रकिनाऱ्यांवर गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.
मुंबईत पोलीस बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. याशिवाय समुद्राकिनाऱ्यांवर जीव रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गणेश विसर्जनाच्या काळात समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता लक्षात घेता मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.