Mumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?

Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला 

Updated: Dec 31, 2022, 07:38 AM IST
Mumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट? title=
Ghatkopar pipe line burst caused massive damage latest Mumbai news

Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं शहरातील घाटकोपर येथे असणाऱ्या एका भागामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. मुंबईत पहाटे साडेतीन वाजता असल्फा मेट्रो स्टेशन परिसरात पाईपलाईन फुटली आणि तिथं पाण्याचे लोट वाहू लागले. यामुळे जवळपास 400 घरात पाणी शिरलं. पाण्याचा वेग आणि जोर इतका होता की रात्री शेकडो घरांमध्ये कंबरेएवढं पाणी साचलं. 

साचलेल्या पाण्यामुळे सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालं. हा विभाग प्रचंड चिंचोळा आणि दाट वस्तीचा असल्यामुळं इथं स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आहे. पाईपलाईन फुटल्यावर त्या पाण्याचा निचरा होण्यास वाट सापडत नव्हती त्यामुळे हे पाणी घराघरात शिरलं. सदर भागात घडलेली या वर्षातली ही दुसरी घटना आहे. 

ब्रिटीशकालीन पाईपलाईन फुटल्यामुळं पूरस्थिती 

घाटकोपर असल्फा येथे असणारी 72 इंचांची ब्रिटीशकालीन पाईपलाईन फुटली आणि या भागात पाणीच पाणी झालं. इतक्या वर्षांपासून असणारी ही पाईपलाईन आता प्रचंड क्षतीग्रस्त झाली आहे. किंबहुना ती फुटल्याचीही घटना वारंवार घडली आहे. पण, तरीही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा सूर स्थानिकांनी आळवला आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!

 

सध्याच्या घडीला या भागात बऱ्याच तासांनंतर साचलेल्या पाण्याचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. इथं पाईपलाईन दुरुस्तीचं कामही हाती घेण्यात आलं असून, लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचा यंत्रणांचा प्रयत्न दिसून येत आहे. सध्याच्या घडीला ही डागडुजी संकटातून तारुन नेईल पण, भविष्यात पुन्हा हाच प्रकार झाल्यास सर्वसामान्यांचे संसार पुन्हा पाण्याखाली जाणार का हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.