मितभाषी एकनाथ शिंदे कसे बनले 'राजकीय नटसम्राट', 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा

2022 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरलं, एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली, शिंदेंचा हा पॉलिटीकल ड्रामा थराराक, अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता

Updated: Dec 30, 2022, 08:48 PM IST
मितभाषी एकनाथ शिंदे कसे बनले 'राजकीय नटसम्राट', 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा title=

अनिकेत पेंडसे, झी मीडिया, मुंबई : जून 2022 मध्ये महाराष्ट्राला आणि जगातल्या 33 देशांना राजकीय नटसम्राट मिळाला. आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde). ठाकरेंच्या सिंहासनाखाली बॉम्ब फोडत राजकीय पटलावर या नटसम्राटाची एन्ट्री झाली. पण अत्यन्त मितभाषी अशी ओळख असणारे एकनाथ शिंदे राजकीय नाटसम्राट झाले कसे.. का झाले.. त्यांचा उठाव फसला असता तर आज त्यांचा काय झालं असतं.. हा राजकीय नटसम्राट असता कुठे.. हे जाणून घेणे तितकच इंटरेस्टिंग आहे

महाराष्ट्राची राजकीय समीकरणं बदलली
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्राची सगळी राजकीय समीकरणंच (Maharashtra Politics) बदलली. इतकी बदलली की राजकीय वैराची जागा व्यक्तिगत वैरानं घेतली. 1978 साली शरद पवारांनी (Sharad Pawar) केलेल्या बंडानंतर सर्वात यशस्वी बंड म्हणून शिंदेंच्या बंडाकडे पाहिलं जातंय. छगन भुजबळ (Chagan Bhujbal), नारायण राणे (Narayan Rane), गणेश नाईक (Ganesh Naik), राज ठाकरे (Raj Thackeray), असे दिग्गजही शिवसेनेतून (Shivsena) फुटले पण जे शिंदेंनी केलं ते कुणालाच जमलं नाही. एकनाथ शिंदेंनी ज्या शिताफीनं गोष्टी केल्या त्याची चाहूल खुद्द राज्याला गृहमंत्रालयालाही लागली नाही. एकनाथ शिंदेंचं बंड फक्त देशात नाही तर परदेशातही गाजलं. 33 देशांनी आपल्या बंडाची दखल घेतली, बिल क्लिंटनही एकनाथ शिंदे कोण आहेत असं विचारत होते, असं खुद्द शिंदेंनीच सांगितलं.

पण शिंदेंनी जे केलं ते सोपं नव्हतं आणि कुणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं.. शिंदेंचा पॉलिटीकल ड्रामा हा थराराक, अनपेक्षित आणि तितकाच रोमांचक होता. मितभाषी एकनाथ शिंदे राजकीय नटसम्राट कसे बनले? 33 देशांनी शिंदेंच्या बंडाची दखल का घेतली? 2022 मधील सर्वात मोठा 'पॉलिटिकल ड्रामा'

20 जून 2022
 विधानपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि भाजपच्या गोटात असा जल्लोष सुरू झाला. पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपचे (BJP) प्रसाद लाड (Prasad Lad) अनपेक्षितरित्या विजयी झाले, तर महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) असतानाही काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा धक्कादायक पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) फ्लोअर मॅनेजमेंटमुळं भाजपनं महाविकास आघाडीची जिरवली. नेमकी कुणाची मतं फुटली? काँग्रेसची की शिवसेनेची? याचा शोध सुरू झाला. आणि त्याचवेळी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) खुर्चीखाली बॉम्ब फुटला.

21 जून 2022 - शिंदेंचं अनपेक्षित बंड
21 जून 2022 ची सकाळ उजाडलीच तीच राज्याला हादरवून सोडणाऱ्या बातमीनं. शिवसेनेचे हेविवेट मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. काही आमदारांसह शिंदे गुजरातला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. विधानपरिषद निवडणुकीच्या प्लॅनिंगमधून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना बाजूला ठेवलं होतं. हा अपमान हीच उंटाच्या पाठीवरची शेवडची काडी ठरली आणि शिंदेंनी ठाकरेंना कायमचा जय महाराष्ट्र केला.

एकनाथ शिंदेंनी गाठलं सूरत
दुपार होईपर्यंत एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांसह सुरतला गेल्याचं कन्फर्म झालं होतं. शिंदेंसोबत 12-13 आमदार रात्रीच्या रात्री सूरतला पोहचले होते. फक्त ठाकरे नाही तर महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारांनाही हादरवून टाकणारी ही घडामोड होती. शिंदेंनी बंड केल्याची खात्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीनं शिवसेना आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला अर्थातच शिंदे समर्थक गैरहजर होते, त्याच दिवशी संध्याकाळी शिंदेंची शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

22 जून 2022 - 'मातोश्री'चे दूत हात हलवत परतले
शिवसेनेत आणखी फूट पडू नये, यासाठी उर्वरित आमदारांनी मुंबई सोडून जाऊ नये, असं फर्मान उद्धव ठाकरेंनी काढलं. मुंबईतील हॉटेल्समध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. तर दुसरीकडं एकनाथ शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर शिंदेंनी ठाकरेंना दिली. शिंदेंची मनधरणी करण्यासाठी मातोश्रीचे सर्वात खासमखास दूत मिलिंद नार्वेकर यांना तातडीनं सूरतला रवाना करण्यात आलं. ठाणेकर रवींद्र फाटकही त्यांच्यासोबत होते. पण शिंदेंनी परतीचे दोर कापले होते. मातोश्रीचे दूत हात हलवत मुंबईला परतले.

23 जून 2022 - शिंदे गटाची जुळवाजुळव
उद्धव ठाकरेंचं फर्मान धुडकावून आणखी काही शिवसेना आमदार सूरतला बंडखोरांच्या गटात दाखल झाले. कालपर्यंत ठाकरेंसोबत वर्षावर असलेले गुलाबराव पाटील आणि उदय सामंत शिंदे कॅम्पमध्ये सामील झाले. सकाळी ठाकरेंसोबत दिसणारे आमदार रात्रीपर्यंत शिंदे गटात सामील होत असल्याचं चित्र पुढचे दोन दिवस सुरूच होतं. शिंदे गटातल्या आमदारांची संख्या वाढल्यानं शिंदेंनी समर्थकांसह मुक्काम गुवाहाटीला हलवला. 

24 जून 2022 - काय झाडी, काय डोंगार... काय गुवाहाटी
गुवाहाटीत शिंदे समर्थक ज्या हॉटेलात थांबले होते तिथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बच्चू कडूंसारख्या अपक्ष आमदारांचंही इनकमिंग सुरू झालं. याच काळात शहाजीबापू पाटलांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल या डायलॉगची अख्ख्या महाराष्ट्रात हवा झाली.

आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा शिंदे गटानं केला आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. गुवाहाटीत हे नाट्य घडत असताना, मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिलं...

शिवसेनेत शिंदे विरुद्ध ठाकरे असा वाद पेटला असताना, भाजपनं सूचक मौन बाळगलं होतं. शिंदेंच्या बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप उद्धव ठाकरे करत होते, पण भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नव्हती. 24 जूनला पहिल्यांदाच भाजप समर्थक दोन अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. शिंदेंसह इतर 16 आमदारांवर झिरवाळ अपात्रतेची कारवाई करणार, त्याआधीच हा राजकीय डाव टाकण्यात आला. एका ईमेलद्वारे हा प्रस्ताव आल्यानं झिरवळांनी मात्र तो फेटाळला..

26 जून 2022 - शिंदेंची सुप्रीम कोर्टात धाव
त्यानंतर सुरू झाली कायदेशीर लढाई. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात शिंदेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दोनच दिवसांनी देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली. सरकार अल्पमतात आल्यानं विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी फडणवीसांनी केली. म्हणजे एकीकडे शिंदे सुप्रीम कोर्टात, तर फडणवीस राज भवनावर. याप्रकरणी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले.

29 जून 2022 - ठाकरेंची सत्ता गेली... 'वर्षा'वरून पुन्हा 'मातोश्री'वर
अखेर उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. सत्तेवरून पायउतार झालेल्या ठाकरेंनी त्याच दिवशी संध्याकाळी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं, आणि पुन्हा एकदा 'मातोश्री' गाठली. वर्षा ते मातोश्री या ठाकरेंच्या परतीच्या प्रवासात शिवसैनिकांना मात्र भावना अनावर झाल्या.

30 जून 2022 - भाजपश्रेष्ठींचा शिंदेंना कौल
एकनाथ शिंदे खास विमानानं गुवाहाटीवरून मुंबईत दाखल झाले. कोणतीही राडेबाजी नको असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले होते. शिंदे विमानतळावरून थेट देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले. पुन्हा एकदा फडणवीस सरकार सत्तेवर येणार म्हणून भाजप नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा फडणवीसांनी केली आणि सगळ्यांनाच ४४० व्होल्टचा जोर का झटका बसला.

आपण या सरकारमध्ये सामील होणार नसल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं होतं. मात्र शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे आदेश दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी दिले आणि ३० जूनच्या संध्याकाळी शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी राज भवनावर पार पडला. शिंदेंचा शपथविधी होत असताना, त्यांचे समर्थक आमदार मात्र गुवाहाटीतूनच हा सोहळा पाहत होते.

3 जुलै 2022
3 जुलैला सगळे शिंदे समर्थक आमदार मुंबईत पोहोचले. नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर बहुमतानं विजयी झाले. नव्या शिंदे फडणवीस सरकारनं 164 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. महाविकास आघाडी सरकार 25 वर्षं टिकेल, अशी गर्जना करणाऱ्यांना विरोधी बाकांवर बसावं लागलं. पण सत्तांतर झालं तरी राजकीय ड्रामा अजून संपलेला नव्हता. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांविरोधातला अविश्वास ठराव, शिंदे गटाचा व्हीप, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची निवड आणि 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई यासाठी ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

ठाकरे गटाकडून चार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या. कायदेशीर लढाई सुरु झाली. ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल तर शिंदे गटाकडून अॅड हरिश साळवे कायद्याचा कीस पाडत होते. दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारला महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता. शिंदेंच्या चार ते पाच दिल्लीवाऱ्या झाल्या, पण विस्तार काही होईना.

9 ऑगस्ट 2022
अखेर 9 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळ विस्तारला मुहूर्त मिळाला. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ आमदारांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. या कॅबिनेटमध्ये एकही महिला मंत्री नव्हती. याचदरम्यान शिंदे गटानं धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेना या नावावरही दावा ठोकला. हा वादही सुप्रीम कोर्टात पोहोचला... धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आले. ही लढाई आता सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचली.

8 ऑक्टोबर 2022 - धनुष्यबाण गोठलं
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवण्याचे तात्पुरते आदेश निवडणूक आयोगानं दिले. ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा झटका होता. 8 ऑक्टोबर 2022. हाच तो ऐतिहासिक दिवस ज्यादिवशी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यात आलं. तब्बल 30 वर्षांपासून धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख बनली होती. आता धनुष्यबाणच नाही, तर शिवसेना नाव वापरायलाही बंदी घालण्यात आली.

10 ऑक्टोबर 2022 - मशाल VS ढाल तलवार
आता नव्या निवडणूक चिन्हासाठी आणि नावासाठी पुन्हा सामना सुरू झाला. त्रिशूळ चिन्हासाठी दोन्ही गट आग्रही होते. पण अखेरीस ठाकरे गटाला मशाल, तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळालं. ठाकरे गटाचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं, तर शिंदे गटाचं बाळासाहेबांची शिवसेना असं नव्यानं बारसं झालं. अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही शिवसेना आपापसात भिडतील, असा अंदाज होता.

शिवसेना ठाकरे गटानं दिवंगत आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली. तर भाजपकडून मुरजी पटेलांना उमेदवारी देण्यात आली. शिंदे गटाची भूमिका अनेक दिवस गुलदस्त्यात होती. दिवंगत आमदाराच्या पत्नीविरोधात भाजपनं उमेदवार देऊ नये, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.. शरद पवारांनीही तसं आवाहन केलं. अखेर शेवटच्या क्षणी भाजपनं उमेदवार मागे घेतला. पण काही अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. 6 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचा अपेक्षित निकाल लागला.. मशाल चिन्हावर ठाकरे गटानं पहिला राजकीय विजय मिळवला.

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट 
गेल्या सहा महिन्यांपासून ठाकरे आणि शिंदे गटात खटका उडाला नाही, असा एकही दिवस जात नाही. दोन्ही बाजूनं आरोप-प्रत्यारोप, आव्हानं-प्रतिआव्हानं सुरूच आहेत. गुलाबराव पाटील, राहुल शेवाळे, शंभुराज देसाई, शहाजीबापू पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत असे शिंदे समर्थक ठाकरे सेनेवर तुफान हल्लाबोल करतात.. तर आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे हे बिणीचे शिलेदार ठाकरे गटाची खिंड लढवतायत. अलिकडेच 28 डिसेंबरला मुंबई महापालिकेतलं शिवसेना कार्यालय कुणाचं यावरुन दोन्ही गट आपापसात भिडले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून स्थिरावले
एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री म्हणून स्थिरावलेत. ठाकरेंनीही विरोधकाची भूमिका मान्य केलीय. तसं पाहायला गेलं तर ठाकरेंनी आतापर्यंत असंख्य बंडं पचवली आहेत. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, ते अगदी राज ठाकरेंपर्यंत. बाहेरच्यांची आणि अगदी घरातल्यांचीही.. पण एकनाथ शिंदेंचं बंड आधीच्या प्रत्येक बंडापेक्षा वेगळं होतं. कारण या बंडामुळे कधी नव्हे एवढी शिवसेना दुभंगली, ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. 2022 मध्ये सुरु झालेला ठाकरे विरुद्ध शिंदे वाद. हा महासंघर्ष आता राजकीय राहिलेला नाही.. तर व्यक्तिगत झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

प्रत्येक आमदाराचं स्वप्न असतं ते मुख्यमंत्री बनण्याचं. महाराष्ट्राच्या इतिहासात ही संधी ज्यांना ज्यांना मिळाली.. आता एकनाथ शिंदे त्या पंक्तीत जाऊन बसलेत.  कुणी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जून संपायच्या आधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झालेले असतील..

2022 मध्ये अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदेंना राजकीय नटसम्राट होताना बघितलं.. शिंदेच्या शब्दात सांगायचं तर बिल क्लीनटनसह 33 देशांनी त्यांच्या उठावाची दखल घेतली. पण 2024 दूर नाहीये. 2024 मध्ये या राजकीय नटसम्राटाचं काय होणार. मुख्यमंत्रीपदाचा मुकुट या राजकीय नटसम्राटाच्या डोक्यावर राहणार की शिंदे फक्त ठाण्याचे एक आमदार बनवून राहणार. हे काळच ठरवेल