मुंबई: कुलाबा परिसरातील फोर्ट कॉनव्हेंट स्कूल या शाळेतून बेपत्ता झालेल्या पाच मुली शनिवारी रात्री सापडल्या. यापैकी चार मुली कुर्ला आणि एक मुलगी मालाडमध्ये सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या या मुली शुक्रवारपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
मात्र, त्यांना शोधण्यात यश आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे या मुली शुक्रवारी दुपारी २.३० वाजल्यापासून बेपत्ता झाल्या होत्या. शाळा सोडल्यावर या पाचही मुली सुरूवातीला गिरगाव चौपाटी या ठिकाणी गेल्या. त्यानंतर त्या हँगिंग गार्डन या ठिकाणी गेल्या. हँगिग गार्डन परिसरात काही वेळ घालवल्यावर या पाचही मुली दादरला गेल्या. तिथे काही वेळ घालवल्यावर त्या ठाण्याला गेल्या होत्या. परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्यातून या मुली शुक्रवारपासून आजपर्यंत फिरत होत्या असे पोलिसांनी सांगितले.