बारामती : बारामती मतदारसंघातून अजित पवार यांच्याविरोधात भाजपाकडून गोपीचंद पडळकर यांना उतरवण्यात येणार आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेशानंतर झालेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून निवडून आणू या असं वक्तव्य केलं. यानंतर गोपीचंद पडळकर समर्थकांनी पक्ष प्रवेश कार्यक्रमात समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात येणार होती. पण त्याआधीच भाजपाने गोपीचंद पडळकर यांना भाजपात येण्याचं आवाहन केलं. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बारामतीतून उमेदवारी देखील जाहीर केली.
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे फायर ब्रॅण्ड नेते मानले जातात. आता त्यांना थेट बारामतीतून उतरवण्यात येणार आहे. बारामती मतदारसंघात धनगर समाजाचं संख्याबळ असल्याने, अजित पवारांना बारामतीतच कसं खिळवून ठेवण्यात येईल. याचा विचार करून भाजपाने अजित पवारांच्या विरोधात बारामतीतून उमेदवारी देण्याचा हा राजकीय डाव खेळला असल्याचं बोललं जात आहे.