राज्यपालांची विमान परवानगीसाठी फोनाफोनी, अमित शाहांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आक्रमक?

राज्यपाल विरुद्ध महाविकासआघाडी वाद वाढणार

Updated: Feb 11, 2021, 12:31 PM IST
राज्यपालांची विमान परवानगीसाठी फोनाफोनी, अमित शाहांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री आक्रमक? title=

दीपक भातुसे, मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शासकीय विमान नाकारल्यानंतर राज्यपालांची विमान परवानगीसाठी फोनाफोनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. शासकीय विमान नाकारल्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिष कुमार सिंह, विकास खारगे तसंच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना फोनवरून संपर्क केला. पण याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याचा राज्यपालांना निरोप देण्यात आला. फोनाफोनी करूनही शासकीय विमान न मिळाल्याने राज्यपाल स्पाईस जेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या आरोपानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे.

राज्यपालांना देहरादूनला जाण्यासाठी आधी विमानाची नोंदणी करण्यात आली होती. मात्र राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर राज्यपाल स्पाईस जेटच्या विमानाने रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल निघाले होते. पण विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यपाल विरूद्ध महाविकासआघाडी सरकार वाद आता शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेत येण्यापासून हा वाद पाहायला मिळतो आहे. अनेक मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल याआधीही आमने-सामने आले आहेत.

महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी याआधी राज्यपालांवर टीका केली आहे. तर राज्यपालांनीही राज्य सरकारवर टीका केली होती.