दीपक भातुसे, मुंबई : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखडयाला मंजूरी दिली आहे. आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे यावेळी राज्यपालांनी कौतूक केले.
राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परिक्षा १५ जूलै ते १५ ऑगष्ट या कालावधीत घेण्यात येतील. करोना परिस्थितीमुळे या कालावधीत परिक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परिक्षा १६ ऑगष्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.
दरवर्षी १५ मे ते १५ जूनदरम्यान आरोग्य विद्यापीठामार्फत पदवी तसेच पदव्युत्तर विविध अभ्यासक्रांच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. पण यावर्षी कोरोना संकट आणि लॉकडाऊन यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. विद्यापीठामार्फत परीक्षांचा प्लॅन तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.
उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.