मुंबईत श्वास घेणं अवघड! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMC अ‍ॅक्शन मोडवर; मार्गदर्शक तत्वे जारी

BMC issued Guidelines : मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई करणार. असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Oct 25, 2023, 10:50 PM IST
मुंबईत श्वास घेणं अवघड! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी BMC अ‍ॅक्शन मोडवर; मार्गदर्शक तत्वे जारी title=
Air pollution in Mumbai

Air pollution in Mumbai : वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह (BMC) मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी तसेच खाजगी संस्था, संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज (दिनांक २५ ऑक्टोबर २०२३) मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. 

सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे अत्यंत काटेकोरपणे केले जावे. याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असे आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जारी मार्गदर्शक तत्त्वे-

१. सर्व प्रकल्प प्रस्तावकांनी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्रा/धातूचे आच्छादन उभारणे अनिवार्य असेल.

२. एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या सर्व बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंचीचे तर एका एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचे पत्रा/धातूचे आच्छादन लावावे.

३. सर्व बांधकामाधीन इमारतींना सर्व बाजूंनी हिरवे कापड/ज्यूट/ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक आहे.

४. कोणतेही बांधकाम पाडताना संबंधित ठिकाण हे वरपासून खालपर्यंत संपूर्णत: ताडपत्री/हिरवे कापड/ज्युट शीटने झाकलेले असावे. प्रत्यक्ष पाडकाम करतेवेळी सातत्याने पाणी शिंपडत राहावे किंवा फवारणी करत राहावी. 

५. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकाम साहित्य चढवताना (लोडिंग) आणि उतरवताना (अनलोडिंग) त्यावर पाण्याची फवारणी करत राहावे. (स्थिर/फिरत्या अँटी स्मॉग गनचा वापर करावा).  

६. बांधकामाच्या ठिकाणी धूळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा/अन्य साहित्यावर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी करावी.  

७. बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत (वरच्या बाजूने आणि सर्व बाजूंनीसुद्धा). जेणेकरून वाहतुकीदरम्यान बांधकाम साहित्य किंवा राडारोडा यांचे कण हवेत मिसळणार नाहीत. वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, जेणेकरुन वाहतुकीदरम्यान ते पडण्याचा धोका राहणार नाही.  

८. सर्व बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. याद्वारे सामानांची ने-आण करणाऱया वाहनांची चाके स्वच्छ केली आहेत आणि वाहनांमध्ये वजन मर्यादा पाळून साहित्य नेल्याची खातरजमा करता येईल.  

९. सर्व बांधकाम प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी सेन्सर आधारित वायू प्रदूषण संनिरीक्षण प्रणाली तैनात करावीत आणि मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण पातळी आढळून आल्यास त्वरित कृती करावी. ही संनिरीक्षण प्रणाली जेव्हा आणि जशी मागणी केली जाईल, त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्यवेक्षणासाठी उपलब्ध करून द्यावी लागेल.  

१०. सर्व कामाच्या ठिकाणी ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगचे काम बंदिस्त भागात केले जावेत आणि त्यामुळे उडणाऱया धूळयूक्त हवेपासून बचाव करण्यासाठी काम करताना सातत्याने पाण्याची फवारणी करत राहावी.  

११. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी/ परिसरात निर्माण होणारा बांधकाम आणि पाडकाम मलबा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बांधकाम व पाडकाम मलबा व्यवस्थापन आराखड्यानुसार, निर्देशित केलेल्या ठिकाणीच नेला जावा. मलबा उतरवल्यानंतर, वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ केले पाहिजे. 

१२. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध पीयूसी (PUC) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ते सक्षम अधिकाऱयांनी जेव्हा आणि जसे मागितल्यास सादर केले जावे. 

१३. सर्व बांधकाम कर्मचारी/व्यवस्थापकांनी मास्क, गॉगल, हेल्मेट इत्यादी वैयक्तिक संरक्षक उपकरणे परिधान करणे अनिवार्य असेल. 

१४. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या पूल आणि उड्डाणपूलासारख्या सर्व प्रकल्पांच्या ठिकाणी २५ फूट उंचीची बॅरिकेडिंग केलेली असावी. 

१५. मेट्रो रेल्वे प्रकल्पाची जमिनीच्या वर सुरू असलेली सर्व कामे २५ फूट उंचीच्या बॅरिकेडिंगने झाकली जावीत. बांधकामाची जागा ताडपत्री/हिरवे कापड/ज्युट शीटने झाकलेली असावी. बांधकामावेळी स्मॉग गन/वॉटर स्प्रिंकलरचा वापर करावा.

१६. वरील सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, बीपीटी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, रेल्वे, शासकीय किंवा निमशासकीय प्राधिकरणे तसेच खासगी बांधकाम प्रकल्पांना अनिवार्य आहेत. 

१७. रात्री उशीरा अवैधपणे टाकला जाणारा बांधकाम आणि पाडकाम मलबा रोखण्यासाठी सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी विशेष पथके तैनात करावीत.  

१८. सर्व विभागांच्या सहायक आयुक्तांनी वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे समावेश असलेले पथक तैनात करावेत. 

१. दोन (वॉर्ड) अभियंता
२. एक पोलिस 
३. एक मार्शल
४. वाहन

प्रत्येक पथकाचे नेतृत्व हे विभाग कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी करतील. 

विभाग स्तरावर ही पथके गठित करून तातडीने त्यांची नेमणूक करण्यात यावी. विभागनिहाय पथकांची संख्या पुढीलप्रमाणे असावी:-
१. लहान विभाग- प्रत्येक विभागासाठी दोन पथके
२. मध्यम विभाग- प्रत्येक विभागासाठी चार पथके
३. मोठे विभाग- प्रत्येक विभागासाठी सहा पथके

१९. अंमलबजावणी पथकांनी संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी करावी. कामाच्या ठिकाणी उपरोक्त नमूद तरतुदींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास, काम थांबवण्याची नोटीस जारी करणे आणि/किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई तत्काळ करावी. 

२०. हे परिपत्रक जारी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत स्प्रिंकलर्स आणि ३० दिवसांच्या आत स्मॉग गन खरेदी आवश्यक असेल. सर्व प्रकल्प प्रस्तावक/कंत्राटदारांनी या मुदतीचे काटेकोरपणे आणि न चुकता पालन करावे. 

२१. बांधकाम साहित्य किंवा बांधकाम आणि पाडकाम साहित्य वाहून नेणारी वाहने, उपरोक्त तरतुदींचे पालन करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी.  

२२. वजनमर्यादेपेक्षा अधिक वजन वाहून नेणारी वाहने, न झाकलेली वाहने, रस्त्यांवर बांधकाम साहित्य पडेल अशारितीने धावणारी वाहने यांच्यावर परिवहन आयुक्त कारवाई करतील आणि आठ वर्षांहून अधिक जुन्या अवजड डिझेल वाहनांना मुंबई कार्यक्षेत्रात वाहतूक करण्यास सक्त मनाई असेल. 

२३. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील महिनाभराच्या कालावधीत दररोज बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, टाटा पॉवर तसेच जवळपासच्या औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योग इत्यादी ठिकाणांहून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणाचे दैनंदिन स्वरूपात एक महिन्यापर्यंत निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी. या कारवाईचा दैनंदिन अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांना सादर करावा. 

२४. सर्व बांधकाम व्यवसायिक/विकासकांनी ज्यांच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टम बसवलेली आहे अशाच वाहनांचा कामांसाठी वापर करावा. 

२५. खुली/सुटी माती, वाळू, बांधकाम साहित्य आणि कोणत्याही प्रकारचा व कुठल्याही प्रमाणातील राडारोडा सीमांकित/समर्पित क्षेत्रामध्ये योग्यरित्या बॅरिकेड केलेल्या, पूर्णपणे झाकलेल्या/ बंद केलेल्या ठिकाणी ताडपत्रीच्या आच्छादनाखाली ठेवावे. सार्वजनिक रस्ते, पदपथ, पदमार्गिका आणि मोकळ्या जागेवर बांधकाम साहित्य आणि राडारोडा टाकला जाणार नाही, याची खात्री करावी. 

२६. प्रत्येक बांधकाम प्रकल्पास्थळी बाहेर पडण्याच्या ठिकाणी वाहनांची चाके धुण्याची सुविधा असावी. प्रमुख रस्त्यांवरील धूळ रोज व्हॅक्यूम स्वीपिंग किंवा पाण्याची फवारणी करून, घासून, झाडू मारून स्वच्छ करावी. महिनाभराच्या कालावधीत सर्व रस्त्यांचे व्यापक आणि जलदरित्या काम पूर्ण करण्यासाठी बाह्य संस्था नियुक्त करून देखील हे काम करता येऊ शकेल. 

२७. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक क्षेत्रामध्ये विशेषतः क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणी कुठेही उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी असेल.