Crime News: गुजरातमधील वापी येथे 1 लाखांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी चोराची माहिती मिळवली असता त्यांना धक्काच बसला. याचं कारण तो साधासुधा नाही तर करोडपती चोर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित सोलंकी आलिशान हॉटेल्समध्ये वास्तव्य करायचा. इतकंच नाही तर चक्क विमानाने प्रवास करायचा.
रोहित सोलंकीने अनेक राज्यांमध्ये चोऱ्या केल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या महिन्यात त्याने वापीमध्ये 1 लाखांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलीस तपास करत होते. तसंच चोराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते.
याच चोरीप्रकरणी पोलिसांनी रोहित सोलंकीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी रोहित सोलंकीची चौकशी केली असतान, तो फार आलिशान आयुष्य जगत असल्याची माहिती समोर आली. त्याने आपण एकूण 19 चोऱ्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. यामध्ये वलसाडमधील तीन, सूरत, सेवलाल, पोरबंदर आणि महाराष्ट्रामधील एक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशातील दोन घटनांचा समावेश आहे.
आरोपी रोहितने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 6 चोरी झाल्याची कबुली दिली आहे. त्याचा अनेक राज्यांमध्ये गुन्हा केल्याचा रेकॉर्ड आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रोहित सोलंकीने मुस्लीम महिलेशी लग्न करत आपलं नाव बदलून अरहान ठेवलं आहे.
विमानातून प्रवास, हॉटेलमध्ये रुम
तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, रोहित सोलंकीचा वांद्रे येथे 1 कोटींहून अधिक किंमतीचा आलिशान फ्लॅट आहे, जिथे तो वास्तव्य करतो. इतकंच नाही तर त्याच्याकडे चालवण्यासाठी ऑडी कार आहे.
वलसाड पोलिसांनी सांगितलं की, रोहित चोरी करण्यासाठी आलिशान हॉटेलमध्ये रुम बूक करायचा. तसंच विमानाने प्रवास करायचा. हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी तो टॅक्सी बूक करत असते. चोरी कऱण्याआधी तो सोसायटींमध्ये जाऊन रेकी करत असे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, रोहितला मुंबईतील डान्स बार आणि नाईट क्लबमध्ये पार्टी करण्याचं व्यसन आहे. तो पूर्णपणे व्यसनाधीन आहे. तो महिन्याला 1.50 लाख खर्च करायचा.