आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात

राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. 

Updated: Feb 19, 2021, 08:02 AM IST
आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात title=

मुंबई : देशातील कोरोनाचं सावट गेल्या काही दिवसांपासून कमी होत असल्याचं दिसून येत होतं. पण आता पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने अनेकांचे प्राण घेतले, तर अद्यापही  काही रुग्ण उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य जनतेपासुन बड्या व्यक्ती देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता राज्याचे  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. 

खुद्द राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी' असं ते 
ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 

दरम्यान, राज्यात देखील कोरोना  रूग्णांची  संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात ५,४२७ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे गाफील न राहता कोरोनावर मात करण्यासाठी योग्य ती काळजी घेण अत्यंत गरजेचं आहे.