रात्रभर मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका

शनिवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे.

Updated: Jul 18, 2021, 07:16 AM IST
रात्रभर मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका title=

मुंबई : शनिवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक भागात वाहतूक कोंडी झाली आहे. भायखळा, सायन, अंधेरीत पाणीच पाणी झालं आहे. रास्त्यांवर  पाणी साचल्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे महत्त्वाचं काम नसेल तर घरा बाहेर पडू नका, असं आवाहन सतत नागरिकांना करण्यात येत आहे. 

मुंबईत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झालीये. शहरातील मुख्य रस्त्यांवर अजूनही पाणी आहे. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी जालीये.. पाण्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे.  मुंबईतील सखल भाग असलेल्या सायन, चेंबूर, कुर्ला, चुनाभट्टी, भांडूप, कुर्ला, अंधेरी, मालाड, बोरिवली आणि कांदिवली येथील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. 

पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकलसेवाही विस्कळीत झालीये. सायन गांधीमार्केटमध्ये मोठ्या प्रणात पाणी साचलंय या पाण्याचा निचरा करण्यासाठी मनपा कर्मचा-यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. ठाणे-सीएसएमटी दरम्यान रेल्वे सेवा बंद पडली आहे. 

दादर, कुर्ला,सायन, परळ, भांडूपमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे.  लांब पल्ल्याच्या गाड्याही खोळंबल्या आहेत. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे दहिसर नदी पाण्याची पातळी ओलांडून वाहू लागलीय. त्यामुळे आजूबाजूच्या घरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.