Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Jul 4, 2023, 11:18 AM IST
Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी title=
Heavy Rains In Mumbai

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातही पाऊस बरसत आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.  तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यांची अर्धवट कामे ,पावसाची संततधार आणि टोलनाक्यामुळे ट्रॅफिक जाम झालंय. कामावर जाणारे मुंबईकर ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे दिसत आहेत. दरम्यान, पुढचे 3 दिवस मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईत एका आठवड्यापेक्षा जास्त पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे सात तलावांची पाणीपातळी आता 15 टक्क्यांच्या वर गेली आहे.

राज्यात पुढचे 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा

राज्यात पुढचे पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय.. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.. रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्गात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.. कोकणात 5 ते 7 जुलैदरम्यान तर मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात 6 आणि 7 जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. आज मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 अंश आणि 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.गुरुवार आणि शुक्रवारी मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात शहरातील सर्वात कमी तापमान 23-24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे तर सर्वाधिक तापमान 27-29 अंश सेल्सिअस या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या आठवड्यात ठाणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्येही मुसळधार पाऊस पडेल. पुण्यातील घाट भागात मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर बुधवारपासून अतिवृष्टीचा इशारा अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई - गोवा महामार्गावर बस आणि ट्रक अपघात

दरम्यान, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी प्रवासी बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इंदापूर नजिक धरणाची वाडी इथं सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापुरात जोरदार पाऊस, स्त्यांना नदी नाल्याचं स्वरुप 

सोलापूर जिल्ह्यात कालपासून दमदार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर पाणी साचलं असून, रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरुप आलंय. शहरातील गणेश पेठ शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शरलंय. अनेक दुचाकी पाण्यात वाहून गेल्यात. कुंभार वेस नाला, विश्रांती चौक, रुपाभवानी मंदिर नाला तुडूंब भरून वाहू लागले. सोलापुरात एका दिवशी 65 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजरी लावल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. 

पावसाचा भाजीपाल्याला मोठा फटका

पाऊस सुरु झाल्याचा सर्वात मोठा फटका भाजीपाल्याला बसला आहे. आवक घटल्यानं भाज्यांचे दर वाढले आहेत. टोमॅटोचे दर शंभर रुपयांवर तर फरसबीचा दर दोनशे रुपयांच्या वर गेला आहे. नेहमीच्या जेवणात वापरली जाणारी लसूण, आल्याचे दरही वाढलेत. आवक सुरळीत होईपर्यंत भाज्यांचे दर वाढलेलेच राहणार असल्याचं कळत आहे.