पोलीस चौकशीला गेले ते आलेच नाही - हिरेन मनसुख यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

 हिरेन मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे.

Updated: Mar 5, 2021, 11:35 PM IST
पोलीस चौकशीला गेले ते आलेच नाही - हिरेन मनसुख यांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : हिरेन मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. हिरेन मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे. 

हिरेन मनसुख यांच्या पत्नी यांनी म्हटलं की, 'पोलिसांना आम्ही सहकार्य केलं. काल १० नंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रँच मधून तावडे यांचा फोन आला होता. चौकशीसाठी गेले ते परत आलेच नाही. आत्महत्या करण्याचा ते विचार करू शकत नाहीत. याची चौकशी व्हावी. शेवटपर्यंत चौकशी व्हावी. जेव्हा जेव्हा पोलिसांचा फोन यायचा तेव्हा हिरेन चौकशी साठी जायचे.'

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी एक स्कॉर्पिओ गाडी स्फोटकांसह आढळली होती. या गाडीचे मालक हिरेन मनसुख होते. आपली गाडी चोरीला गेली होती. याबाबत आपण आधीच तक्रार केली आहे. असं त्यांनी म्हंटलं होतं. पण आता त्यांचाच मृतदेह मुंब्रा खाडीमध्ये आढळून आल्य़ाने या प्रकरणात आणखी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम या प्रकरणाचा तपास करत असतानाच या प्रकरणात या गाडीचे मालक हिरेन मनसुख यांच्या मृत्यूने या प्रकरणाचं गुढ आणखी वाढलं आहे. काल रात्रीपासून बेपत्ता असलेले हिरेन यांचा मृतदेह आज मुंब्रा खाडीत सापडला आहे.

पोस्टमॉर्टम पूर्वी आत्महत्या म्हणणे चुकीचे आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून चौकशी करण्यात यावी. हिरने यांनी आत्महत्या केलेली नाही. असं त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे.

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण विधीमंडळात ही उचलून धरलं. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणावर माहिती देतांना म्हटलं की, 'मुंबई पोलिसांवर त्यांचा विश्वास आहे का ? या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. यातून कळेल की हत्या की आत्महत्या? त्यांच्या मनात सचिन वाझेबद्दल राग का आहे ? ते एक यंत्रणेचा भाग आहेत. सुशांत सिंग प्रकरणाचा तपास असाच दिला गेला होता, त्याचे काय झाले आपणास माहिती आहे.'