Mumbai : काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांचा मुलगा गणेश हांडोरे (Ganesh Handore) याने काल रात्री एक दुचाकी स्वराला स्वत:च्या कारने ऊडवून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. गणेश हा ज्यूस पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता. मात्र परत येताना चेंबूर इथल्या आचार्य कॉलेज जवळ त्याने गोपाळ आरोटे या दुचाकी स्वराला धडक दिली आणि तिथून पळ काढला. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी (Govandi Police) गुन्हा दाखल करुन गणेशला अटक केली आहे. मात्र त्याची शुगर वाढल्याने त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर जखमी गोपाळ वर झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गोवंडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
काय घडलं नेमकं?
गणेश हंडोरे यांनी आपल्या कारने चेंबूरजवळ दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गोपाळ आरोटे नावाचा तरुण जखमी झाला. कारच्या धडकेने गोपाळ रस्त्यावर पडला पण त्याला उपचारासाठी दाखल करण्याऐवजी गणेश हंडोरे याने तिथून पळ काढला. यानंतर शनिवारी गणेश हंडोरेविरोधात गोवंडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कलम 110, 125 (अ), (ब), 281, बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 (अ), (ब), 184 नुसार गुन्हा दाखल करून गणेश हंडोरेला अटक केली.
कोण आहेत चंद्रकांत हंडोरे?
अटक करण्यात आलेल्या गणेश हंडोरेचे वडिल हे काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात दलित समाजाचा अग्रणी चेहरा म्हणून चंद्रकांत हंडोरे यांची ओळख आहे. 1985 साली मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 1992-93 मध्ये ते मुंबईचे महापौर राहिले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2004 मध्ये चंद्रकांत हंडोरे चेंबूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकले आणि विलासराव देशमुख मंत्रिमंडाळत ते कॅबिनेट मंत्री बनले.