मुंबई : फेब्रुवारीअखेर सिनेमा-नाट्यगृहांसह हॉटेल, बार 100 टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत. (Hotels, bars with cinemas and theaters to start 100 per cent capacity by end of February - Rajesh Tope)
आरोग्य मंत्र्यांच्या संकेतानुसार फेब्रुवारीअखेर नाट्यगृह, चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्यानं नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याकडे कल राहिल, अशी माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मुंबईतल्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने घसरत असल्याने पुढचे दोन आठवडे रुग्णसंख्येत अशीच घट कायम राहिली तर फेब्रुवारीनंतर मुंबई 100 टक्के निर्बंधमुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई अनलॉक करण्याची शिफारस महापालिका टास्क फोर्सला करणार आहे. त्यामुळे मुंबई लवकरच निर्बंधमुक्त होण्याची शक्यता आहे.