ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्या; मी हमखास जिंकेन- रामदास आठवले

या मतदारसंघातील लोक मला ओळखतात.

Updated: Mar 30, 2019, 02:07 PM IST
ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्या; मी हमखास जिंकेन- रामदास आठवले title=

मुंबई: शिवसेना-भाजपने ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्यावी. मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून दाखवेन, असा दावा रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे. ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास विरोधात मतदान करण्याची किंवा शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ईशान्य मुंबईतील उमेदवारीचे घोडे अडले आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून लढण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, या मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ रिपाईच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवेन. या मतदारसंघातील लोक मला ओळखतात. यापूर्वी मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती तेव्हा मला २.२५ लाख मते मिळाली होती, असे आठवले यांनी सांगितले. 

त्यामुळे आता शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरीट सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेची मते राष्ट्रवादी आणि मनसेकडे वळण्याची शक्यता आहे. एखादा नवखा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यातही तितकाच धोका आहे. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ गमवावा लागू शकतो. 

किरीट की स्पिरिट, सोमय्यांवर 'मातोश्री'च्या दारावर जाण्याची वेळ

तर दुसरीकडे रामदास आठवले सुरुवातीपासून रिपाईसाठी लोकसभेची किमान एकतरी जागा सोडावी, यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आठवले यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिल्यास भाजप-शिवसेनेती वाद टळू शकतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरमध्ये गेले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ईशान्य मुंबईतील उमेदवारीसंदर्भात चर्चा होऊ शकते.