बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी

बाबासाहेब आपण अजून हवे होतात, नितीन गडकरी भावूक 

Updated: Nov 15, 2021, 08:24 AM IST
बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी  title=

मुंबई : एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भावूक होऊन दिली. 

वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते.
आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच!

नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता, असं देखील नितीन गडकरी यावेळी म्हणाले. 

आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात!! ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो.  तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आणि अवघ्या महाराष्ट्राला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती, नितीन गडकरींनी भावूक होऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आदरांजली अर्पण केली.