'महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही?'

भाजपने प्रथम आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे.

Updated: Nov 7, 2019, 03:49 PM IST
'महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही?' title=

मुंबई: महायुतीला जनमताचा कौल असेल तर भाजप सत्तास्थापनेचा दावा का करत नाही? भाजपचे नेते राज्यपालांना भेटून मोकळ्या हातांनी का परतले, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी राऊत यांनी भाजपला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणायची असल्याचा संशय व्यक्त केला. भाजप स्वत:देखील सत्तास्थापनेचा दावा करत नाही आणि इतरांनाही पुढे जाऊ देत नाही. भाजपने प्रथम आम्ही सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर करावे. त्यानंतरच शिवसेना सरकार स्थापन करून सभागृहातही बहुमत सिद्ध करून दाखवेल, असे राऊत यांनी सांगितले. 

शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी आज दुपारी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. राज्याच्या राजकारणात हालचाली सुरु आहेत. ज्यांच्यामुळे अस्थिरता निर्माण होतेय, ते राज्याचे नुकसान करत आहेत. मात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री आल्यावर ही अस्थिरता संपेल. यापुढे सेनेचा मुख्यमंत्रीच राज्याचे नेतृत्त्व करेल, असे संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.