मुंबई: अजून एक दिवस संप सुरु राहिला तर मुंबईत महानंद दुधाचा तुटवडा जाणवेल, अशी माहिती महानंद डेअरीचे उपव्यवस्थापक एस.व्ही.चौधरी यांनी दिली. गोरेगाव इथल्या महानंदा डेअरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दूध आलेलं नाही. संपाची हाक देण्यात आल्यानं अगोदरपासूनच दुधाचा साठा महानंदा डेअरीमध्ये करण्यात आला होता. परंतु संपामुळे सोमवार आणि मंगळवारी दूध न आल्यामुळे आता महानंद दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.
मुंबईतल्या अनेक दूध डेअऱ्यांवर आज पश्चिम महाराष्ट्रातून येणारं दूध पोहचलेलं नाही. गोकूळ, अमूल, महानंद आणि वारणाचं दूध मिळत नाहीय. नेहमीपेक्षा आवक घटल्यानं तरी दूधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईत ब्रँडेड दुधाचा तुटवडा जाणवतोय. आता सुट्ट्या दुधावर मुंबईची भिस्त आहे.
आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ठाण्यात दूधाचा तुटवडा जाणवायला सुरूवात झालीय. गोकुळ दूध 50% कमी आल्यानं ठाण्यात दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा ताण बाकीच्या दुधाचा व्रिक्रीवर झालाय. रोज एक लिटर दूध घेणारे ग्राहक जास्त दूध विकत घेत आहेत.