IIT Bombay : देशातल्या प्रतिष्ठीत इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT) मुंबई या शैक्षणिक संस्थेत शाकाहारी विरुद्ध मासांहारी (Veg-Nonvet Issue) वाद पेटला आहे. या संस्थेच्या हॉस्टेल कॅंटीनमध्ये मासांहारी जेवणावरुन एका विद्यार्थ्याला आर्थिक दंड ठोठवण्यात आला आहे. नॉन-व्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या कॅंटीनमध्ये बसण्यास विरोध होत आहे. IIT मुंबईची फूड पॉलिसी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मेसमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे टेबल ठेवण्यात आले असून शाकाहारी टेबलवर बसून मांसाहार खाण्याऱ्या विद्यार्थ्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्या आला आहे. विद्यार्थ्याने फूड पॉलिसीचं पालन केलं नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यावर लावण्यात आला आहे.
IIT मुंबईत शाकाहारी जेवणासाठी वेगळं टेबल आहे. या टेबलवर बसून नॉन-व्हेज खाण्याला बंदी आहे. यावरुन वाद निर्माण झाला असून IIT मुंबईच्या फूड पॉलिसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
आयआयटी मुंबईच्या हॉस्टेल 12, 14 आणि 14 साठी एकच मेस आहे. या मेसमध्ये व्यवस्थापनाने 6 टेबल हे फक्त शाकाहारी खाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलं आहे. जैन मेन्यूच्या आधारावर हे तयार करण्यात आलं आहे. पण याला काही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. 28 सप्टेंबरला आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी शाकाहारी टेबलवर कब्जा केला. तसंच शाकाहारी आणि मांसाहारी टेबल वेगळे ठेवण्याला विरोध केला.
शाकाहारी-मांसाहारी असा भेदभाव केल्याने मुस्लिम, मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना वेगळं ठेवलं जात असल्याचा आरोपही विद्यार्थी संघटनांनी केला. पण मेस व्यवस्थापनाने विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईला आता विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.
मेस व्यवस्थापनाने जारी केली नोटीस
आयआयटी मुंबईतल्या मेस व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची नोटीस जारी केली आहे. मेसच्या नियमांचं पालन केलं नाही तर अशा विद्यार्थांना दहा हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला जाईल असं या नोटीशीत नमुद करण्यात आलं आहे. मेसमधील वातावरण बिघडवणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. आंबेजकर पेरियार फुले स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत या नोटीशीचा विरोधा केला आहे.
याआधीही असे प्रकार
काही विद्यार्थ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या आधीही असे प्रकार घडल्याचं सांगितलंय. हॉस्टेल क्रमांक 12 च्या मेसमध्ये काही महिन्यांपूर्वी केवळ शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी टेबल असे पोस्टर लावण्यात आले होते. मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्यांना बळजबरीने जागा खाली करावी लागेल असं सांगण्यात आलं होतं. यावरुनही बराच वाद झाला होता.