मलबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला?

Property in Mumbai: एका महिलेने मलबार हिलमध्ये चक्क तीन फ्लॅट खरेदी केले आहेत. कोण आहे ही महिला जाणून घेऊया.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 3, 2023, 06:20 PM IST
मलबार हिलमध्ये खरेदी केले तीन आलिशान फ्लॅट, किंमत तब्बल 263 कोटी, कोण आहे ही महिला? title=
Param Capital Director Buys 3 Luxury Flats For 263 Crore in Malabar Hills

Property in Mumbai: मुंबईतील उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून मलबार हिल ओळखले जाते. या भागात देशातील अनेक श्रीमंत व्यापारी व उद्योजकांची घरे आहेत. समुद्र किनारी वसलेल्या या भागात घरे घेण्यासाठी लोक करोडो-अब्जो खर्च करण्याची तयारी दर्शवतात. अशातच एका महिलेने मलबार हिलमध्ये 3 आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. या तीन फ्लॅटची किंमत 263 कोटी इतकी आहे. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात. 

परम कॅपिटलच्या संचालिका आशा मुकुल अग्रवाल यांनी 263 कोटी रुपयांचे तीन आलिशान फ्लॅट मलाबार हिलमध्ये खरेदी केले आहेत. आशा यांनी जवळपास 13 कोटींची स्टँप ड्युटी जमा केली आहे. मलाबार हिल येथे असलेल्या लोढा मलबार बिल्डिंगमध्ये जवळपास 19,254 चौरस फुटांचे घर 10 कार पार्किंगसह खरेदी केले आहे. इंडेक्स टॅप डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आशा अग्रवाल यांनी बिल्डिंगमधील 25 व्या मजल्यावर दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. 

25 व्या मजल्यावर असलेल्या दोन फ्लॅटचे क्षेत्रफळ 9,719 चौरस फुट असून पाच कार पार्किंगच्या जागेसाठी तब्बल 132.75 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर, 24व्या मजल्यावर 9,535 चौरस फुटाचे क्षेत्र असलेला एक फ्लॅट आणि पाच कार पार्किंग होतील इतकी जागा त्यांनी 130.24 कोटींना घेतली आहे.

आशा अग्रवाल यांनी तीन घरं आपल्या नावावर करण्यासाठी 6.51 कोटींची स्टँप ड्युटी भरली आहे. मलाबार हिल ही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठीत जागा आहे. समुद्र किनाऱ्यालगतच असलेल्या ही जागा निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. त्यामुळं या भागात जागांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकाने वांद्रे येथे 102.84 कोटींमध्ये 9.077 चौरस फुटाचे घर खरेदी केले होते. 

मुंबईत छोट्या घरांसह लग्झरी घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. या वर्षांत आत्तापर्यंत 90 हजाराहून अधिक घरांसाठी प्रोपर्टी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत. महागड्या घरांच्या विक्रीमुळं सरकारला यावर्षात फेब्रुवारी, मार्च, सप्टेंबरमध्ये 1 हजार कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. सरकारला फेब्रुवारीमध्ये घरांच्या विक्रीतून 1,111 कोटी रुपये आणि मार्चमध्ये 1,225 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्कापोटी सरकारला 1,127 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. सप्टेंबरमध्ये मुंबईतील 10,694 मालमत्ता नोंदणीतून एकूण 1,127 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.