दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात महत्वाची बातमी

 बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर

Updated: Jan 4, 2021, 07:37 AM IST

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत. 

सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

आजपासून शाळा 

पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमधल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार आहेत. कोरोनाचे निर्बंध पाळून शाळा उघडण्याची तयारी प्रशासनानं केली आहे. 

फिजिकल डिस्टन्सिंग तसंच स्वच्छतेविषयीचे नियम पाळून वर्ग भरवले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे पालकांची संमती घेऊनच मुलांना शाळांमध्ये पाठवलं जाणार आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये कितपत उपस्थिती बघायला मिळते ते  बघावं लागणार आहे.