Good News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे

महाविकास आघाडी सरकारने परवडणारी ३० हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे.  

Updated: Mar 4, 2020, 08:42 AM IST
Good  News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे title=
संग्रहित छाया

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने परवडणारी ३० हजार घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. याबाबत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत तशी घोषणा केली.  मुंबई परिसरात सर्वसामान्यांसाठी ३० हजार घरांचे काम लवकरच हाती घेण्यात आहे, असे ते म्हणालेत.

मुंबईच्या परिसरात पाच वर्षांत पाच लाख घरे बांधणे शक्य असून महाराष्ट्राच्या स्थापनेला ६० वर्षे होत असल्याचे औचित्य साधत १ मे २०२० पर्यंत सर्वसामान्यांसाठी ३० हजार घरांची निर्मिती करणारे प्रकल्प सुरू होतील. त्यानंतर दोन वर्षांत ते पूर्ण केले जातील. मुंबई महानगर क्षेत्रात राहणाऱ्यांना माफक आकाराच्या परवडणाऱ्या घरांची गरज असून बांधकाम क्षेत्रातील मंदी त्यातूनच दूर होऊ शकते, असे जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

Good  News । मुंबईत परवडणारी ३० हजार घरे

मुंबई महानगरक्षेत्रातील घरे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, म्हाडाची घरे यावरील चर्चेला उत्तर देताना आव्हाड यांनी ही माहिती दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सर्वात मोठा अडथळा हा पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचा असतो. त्यासाठी आता मुंबई महानगरपालिका-म्हाडामध्ये जावे लागणार नाही. एसआरएमध्येच ९० दिवसांत ती तयार होईल अशारितीने केंद्रीय यंत्रणा राबवण्यात येईल, असेही आव्हाड यांनी जाहीर केले.

दरम्यान, बिल्डर लॉबीला महाविकास आघाडी सरकारने थेट इशारा दिला आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे ३० दिवसांत दिली नाहीत तर फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आव्हाड यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांना दिला. कामाठीपुरा हे मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून परवडणारी घरे आणि व्यावसायिक संकुल होऊ शकते. त्यामुळे भेंडी बाजार पुनर्विकासच्या धर्तीवर कामाठीपुऱ्याचाही विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून युनोच्या सामाजिक प्रभाव निधीतून त्यासाठी पैसे मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहितीही आव्हाड यांनी दिली.

तसेच मुंबईतील गृहनिर्माणाबाबत आमदारांच्या समितीने दिलेल्या अहवालावर लवकरच कार्यवाही होईल. गृहनिर्माणाशी संबंधित अनेक कलमांमध्ये बदल करण्यात येतील, असेही आव्हाड म्हणाले. बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राहिले तेथे जिवंत स्मारक उभारण्यात येणार असून दोन वर्षांत ते पूर्ण करण्यात येईल. अण्णाभाऊ साठे यांचेही स्मारक लवकरच पूर्ण करण्यात येईल. मुंबईतील चाळी आणि झोपडपट्टी यावर एक कॉफी टेबल पुस्तक तयार करत असल्याची घोषणा यावेळी आव्हाड यांनी केली.

0