Indian Navy : भारतीय नौदलाच्या आयएनएस कोलकाताने शनिवारी एमव्ही रुएन या जहाजावर यशस्वीरित्या बचाव कार्य केले आहे. 35 सोमालियन चाच्यांना ताब्यात घेऊन आयएनएस कोलकाता युद्धनौका मुंबईत पोहोचली आहे. गेल्या वर्षी 14 डिसेंबरपासून हे जहाज सोमाली चाच्यांच्या ताब्यात होते. एमव्ही रुएन हे मालवाहू जहाज सुमारे 37,800 टन माल घेऊन प्रवास करत होते. बल्गेरियातील सात, मंगोलियातील एक आणि म्यानमारमधील नऊ अशा 17 क्रू मेंबरसह जहाज सोमालियन चाच्यांनी पकडले होते. अखेर 40 तासांच्या कारवाईनंतर भारतीय नौदलाने कर्मचाऱ्यांची सूटका करत सोमाली चाच्यांना अटक केली आहे.
याप्रकरणी भारतीय नौदलाकडे मदत मागण्यात आली होती. त्यानंतर भारतीय नौदलाने बेपत्ता जहाज 1400 नॉटिकल मैल म्हणजेच भारतीय किनारपट्टीपासून 2600 किमी अंतरावर या जहाजाला शोधून काढले. त्यानंतर मार्कोस सैनिकांना सी-17 विमानाने जहाजावर उतरवण्यात आलं. 15 मार्च रोजी सकाळी हे ऑपरेशन सुरू झाले होते. ड्रोनच्या मदतीने अपहरण केलेल्या जहाजावर लक्ष ठेवण्यात येत होते. तसेच समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले. मात्र ड्रोनवर गोळीबार करून चाच्यांनी आपला हेतू उघड केला.
त्यामुळे परिस्थिती पाहता नौदलाने सी-17 विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने मार्कोस कमांडोना जहाजावर उतरवले. नौदलाच्या कमांडोंना पाहताच सर्व 35 चाच्यांनी आत्मसमर्पण केले. समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर, संपूर्ण जहाजाची कसून तपासणी केली गेली ज्यामध्ये नौदलाने अनेक शस्त्रे, अमली पदार्थ आणि इतर प्रतिबंधित वस्तू जप्त केल्या. सुमारे 40 तास चाललेल्या कारवाईमध्ये, नौदलाने एमव्ही रुएनच्या सर्व 17 क्रू मेंबर्सना कोणत्याही दुखापतीशिवाय यशस्वीरित्या सोडवले आणि सर्व 35 सोमाली समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले.
चाचेगिरी विरोधी कायदा, 2022 नुसार, आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. आरोपींना आयपीसीच्या कलमांखाली न्यायालयात हजर करून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 2008 पासून, भारतीय नौदलाने 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात आपली जहाजे तैनात केली आहेत जेणेकरून या भागातून जाणाऱ्या खलाशी आणि मालवाहू जहाजांची सुरक्षा पुरवली जाईल.
दरम्यान, आयएनएस कोलकाता हे भारतीय नौदलाच्या कोलकाता-श्रेणीच्या स्टेल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र नाशकांचे प्रमुख जहाज आहे. कोलकाताया भारतीय शहराच्या नावावरून हे लढाऊ जहाज बांधण्यात आले आणि 10 जुलै 2014 रोजी सागरी चाचण्या पूर्ण केल्यानंतर नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. 16 ऑगस्ट 2014 रोजी आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे जहाज अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आले.