पवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार

Loksabha 2024 Election Mahayuti Seat Sharing: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाबद्दल चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या संमतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 23, 2024, 01:22 PM IST
पवारांना शह देण्यासाठी महायुतीचा खेळी! NCP विरुद्ध NCP सामना; अजित पवार गटात शिंदेंचा शिलेदार title=
शरद पवारांना धक्का देण्यासाठी महायुतीचा निर्णय

Loksabha 2024 Election Mahayuti Seat Sharing: लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील 48 जागांवरील उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये वाटाघाटी सुरु असतानाच शिंदे गटातील एका नेत्याने थेट अजित पवार गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशाला एकनाथ शिंदेंबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली आहे. या नेत्याचा पक्षप्रवेश 26 मार्च रोजी होणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) नेते सुनील तटकरेंनी सांगितलं आहे. शिंदे गटातून अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या या नेत्यानेही वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तो नेता कोण?

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंविरुद्ध शिरुर मतदारसंघातून यंदा शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार नाही असं तिन्ही पक्षांच्या चर्चेदरम्यान निश्चित झालं आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या निवस्थानी झालेल्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यावर सहमती दर्शवल्यानंतर आता शिरुर मतदारसंघ अजित पवार गटाला गेल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. स्वत: शिवाजीराव अढळराव पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही मोठ्या थाटामाटात अढळरावांचा पक्षप्रवेश 26 मार्च रोजी पार पडणार असल्याचं सांगितलं आहे.

बाळबोध प्रश्न विचारण्याची गरज नाही

'देवगिरी' बंगल्यावरील बैठकीसंदर्भातील तपशील स्वत: शिवाजीराव अढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. "मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांशी माझं बोलणं झालं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांचं फडणवीसांशी बोलणं झालं. त्यामुळे मला 26 तारखेला प्रवेशासठी हिरवा कंदील दिला आहे," असं शिवाजीराव अढळराव पाटील यांनी म्हटलं आहे. तुम्हाला उमेदवारी मिळणार का या प्रश्नाला उत्तर देताना शिवाजीराव अढळराव पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. "ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय उमेदवारी निश्चित होईल का हा बाळबोध प्रश्न विचारण्याची गरज नाही," असं अढळराव पाटील म्हणाले.

नक्की वाचा >> '..तर केजरीवाल अजित पवारांप्रमाणे..', 'डरपोक' म्हणत ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदी-शहा कर्णाचे..'

किती मतं मिळणार?

"2019 चा बदला घेणार का?" या प्रश्नाला शिवाजीराव अढळराव पाटील यांनी, "त्यासाठीच मी उभा राहणार आहे." असं सांगितलं. तसेच पत्रकारांनी विजयाची खात्री आहे का? हे विचारलं असता, "100 टक्के खात्री आहे. मला काय माझ्या जनतेलाही आहे. माझं जे गणित आहे त्यानुसार काहीही पाठबळ नसताना मी आतापर्यंत ज्या निवडणूक जिंकलो आहे ज्यामध्ये पहिली निवडणूक 30 हजार मतांनी जिंकलो. दुसरी 1 लाख 80 हजारांनी जिंकलो तर तिसरी 3 लाख 3 हजारांनी जिंकलो. चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल यात शंका नाही," असं शिवाजीराव अढळराव पाटील म्हणाले.

नक्की वाचा >> '..तर 'जय गुजरात'ची सक्ती लागेल!' मराठी अभिनेता म्हणाला, 'अजित पवार शाहांपुढे लाचार, उदयनराजेंचा..'

विरोधकांना सगळं माहिती आहे

तसेच, "मी विरोधकांना काही सांगण्याची गरज नाही. त्यांना सगळं माहिती आहे," असंही शिंदे गटातून अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या शिवाजीराव अढळराव पाटील यांनी म्हटलं.