मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : आपल्याच मुलीचा म्हणजे शीना बोराचा हत्येचा आरोप (Sheena Bora Murder Case) असलेली इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjee) आज जामिनावर तुरुंगाबाहेर आली. तब्बल साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी भायखळा महिला कारागृहातून बाहेर पडली. इंद्राणी जेव्हा तुरुंगाबाहेर पडली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. तिने पांढरा ड्रेस घातला होता आणि केस मोकळे सोडले होते. तिचे वकील ऍड. सना खान यांच्या मर्सिडीज कारमधून ती वरळी स्थित आपलं घर मार्लो बंगला येथे रवाना झाली.
तुरूंगातून बाहेर पडल्यावर काय म्हणाली इंद्राणी ?
तुरूंगातून बाहेर पडल्यावर मीडियाच्या कॅमेराकडे इंद्राणीने अगदी सेलिब्रिटीसारखा हात उंचावून दाखवला. जेव्हा तिची गाडी तुरुंगाच्या गेटमधून बाहेर पडली तेव्हा इंद्राणीने कारची काच लावली नव्हती. यामुळे मीडियाने तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता 'आज मैं बहुत खुश हू्ं' एवढंच इंद्राणी म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कोणतेही भाव काही दिसत नव्हते.
तुरुंगातून इंद्राणी काय काय बरोबर घेऊन गेली ?
तब्बल साडेसहा वर्ष तुरूंगात मुक्कामी असलेल्या इंद्राणीने बरंच सामान बहुदा जमवलं होतं. तीन बॅग्ज, दोन पर्स आणि दोन मोठे खाकी बॉक्स असे सामान तिने आपल्या बरोबर बाहेर आणलं. यामुळे तुरूंगात नक्की तिने काय सामान जमवलं अशी एक चर्चा सुरू झाली आहे.
इंद्राणी कुटुंबियांशी बोलू शकणार नाही
इंद्राणी मुखर्जी तुरूंगातून बाहेर जरी आली असली तरी ती आपल्या कुटुंबियांशी बोलू शकणार नाही. कारण शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तिच्या कुटुंबातील सारेचजण साक्षीदार आहेत, आणि साक्षीदारांशी न बोलण्याची अट न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातली आहे. यामुळे घटस्फोट घेतलेले आपले पती पीटर मुखर्जी आणि अगदी दुसऱ्या पतीपासून झालेली विधी।नावाच्या मुलीशीही इंद्राणीला बोलता येणार नाही.
दरम्यान इंद्राणी आपली वकील ऍड. सना खान हिच्या मर्सिडीज कारमधून तुरुंगातून बाहेर पडली. तिला घ्यायला एक महिला आली होती ती कोण होती हे स्पष्ट होऊ शकले नाही.