मुंबई : नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार आहे. याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार या दोन अधिकार्यांचा समावेश आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता.
राज्यातील नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची नेमणूक; गृहमंत्र्यांची माहिती #Phonetapping #Maharashtra #BJP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 3, 2020
भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. शिवसेना नेत्यांचेही फोन टॅप झाल्याचा शिवसेना नेत्यांनी दावा केला होता. फोन टॅपिंग झालेलं नाही. तर कर नाही त्याला डर कशाला, चौकशी करा असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आपल्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचे फोन टॅप केले गेल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. अनेक नेत्यांवर पाळतही ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधी नेत्यांनी केल्या होत्या. अनेक नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारीही फडणवीस सरकारच्या काळात विरोधी नेत्यांनी केल्या होत्या. त्याचीही दखल घेण्यात आली असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितलं होतं.